खेडचे नायब तहसीलदार निलंबित

राजगुरूनगर- पदाचा दुरुपयोग करून खोट्या दस्तऐवजाच्या माध्यमातून भोगवटा वर्ग दोनची जमीन भोगवटा वर्ग एक तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेडचे महसूल नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश पुण्याचे आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे.
बाबुराव बबन बोडके असे निलंबित झालेल्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, चासकमान धरणांतर्गत साकुर्डी (ता. खेड) येथील शेतकरी विठ्ठल राघू बोंबले यांच्या जमिनीचे 1979 मध्ये चासकमान धरणासाठी संपादन करण्यात आले होते. त्याबदल्यात त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी खरपुडी बुद्रुक येथे 1 हेक्‍टर 58 आर इतकी जमीन मंजूर केली होती.
महसूल नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांनी तहसीलदारांच्या अधिकारपदाचा गैरवापर करून ही जमीन भोगवटा वर्ग एक असा अहवाल तयार केला होता. याबाबत तत्कालीन तहसीलदार अर्चना यादव यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला असता, हे भोगवटा वर्ग दोनचे भोगवटा वर्ग एक पत्र नायब तहसीलदार बाबुराव बबन बोडके यांनी तयार केल्याचे लक्षात आले. त्यानंतर नायब तहसीलदार बोडके यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आला होता. खेड पुनर्वसन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुनील रोकडे यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ही जमीन गट क्र.1217/2, 1157/2,1158/2 या पुनर्वसनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या मिळकती जमीन भोगवटा वर्ग एक करण्यसाठी तहसीलदार पदाचा कार्यभाग नसतानाही तशी स्वाक्षरी झालेले पत्र दि. 15 जून 2018 रोजी कामगार तलाठी यांना दिले आहे. त्यांच्या नोंदी असलेल्या कार्यान्वित नोंदवहीतील पाने फाडली आहेत. असा आरोप ठेवत नायब तहसीलदार बोडके यांच्या विरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात 22 सप्टेंबर 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून पुणे विभागीय आयुक्‍तांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालात बोडके यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस केली होती. यावरून बोडके यांचे वर्तन लोकसेवक म्हणून सचोटीचे नसल्याचे स्पष्ट केले होते.
पुण्याचे आयुक्‍त डॉ दीपक म्हैसकर यांनी महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम 1979 मधील नियम 4 च्या उपनियम 1(अ)व(क)अन्वये व त्या नियमावलीतील परतुकानुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून नायब तहसीलदार बी बी बोडके, यांना सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे. याबरोबरच प्रस्तुत आदेश अमलात असे पर्यंत बी बी बोडके यांची निवाशी उपजिल्हाधिकारी पुणे येहते दैनदिन उपस्थिती नोंदवावी व त्या अहवालावर निलंबन भत्ता देय होतील पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. बी बी बोडके यांना निलंबन काळात रजेबाबत वेतन व भत्ते यावर डॉ म्हैसकर यांनी नियम तरतूदीबाबत अटी घातल्या आहेत.

  • खरेदी विक्रीला स्थगिती
    बोगस वाटप झालेल्या आठ जमिनींच्या प्रकरणात झालेल्या खरेदी विक्रीला स्थगिती देण्यात आली असल्याचे खेड प्रांत तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले हे प्रकरण समोर येताच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. दरम्यान खोटे दस्तऐवज तयार करून पुनर्वसनच्या जमिनींचे व्यवहार करणारी मोठी टोळी कार्यरत असून यामध्ये काही महसूल कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)