खून प्रकरणात तरूणाचा जामीन फेटाळला

पुणे – वाढदिवसादिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तलवारीने डोक्‍यावर वार करून खून केल्याप्रकरणात एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस.के.कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे.
तेजस मुकुंद शिंदे (वय 23, रा. डाळ आळी, राजेंद्र चौक, तळेगाव दाभाळे) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात महेश मुंकुंद शिंदे (वय 21) आणि सलमान नहीन शेख (वय 19, दोघेही, रा. तळेगाव दाभाडे) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोघे न्यायालयीन कोठडीत आहे. एका अल्पवयीन मुलालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. अमोल भिमा चुकाटे (वय 24, रा. रामोशी वाडा, डाळ आळी, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा भाचा अजय महादेव भंडलकर (वय 19, रा. तळेगाव दाभाडे) याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 च्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील डाळ आळी येथे घडली. घटनेच्यापूर्वी एक महिना वाढदिवसाच्या दिवशी मयत, आरोपी यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरून डोक्‍यात तलवारीने वार करून चुकाटे यांचा खून करण्यात आला. भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला तलवारीने वार करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या तेजस याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. त्याच्याविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्याचे दिसून येत आहेत. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने तेजसचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)