खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी जेजुरी येथून केली अटक

पुणे – गरिबांना त्रास का देतो, अशी विचारणा केल्याने डोक्‍यावर वार करून खून केल्याप्रकरणातील आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी जेजुरी येथून अटक केली. शिवा ऊर्फ पोपट महादेव पवार (नागाव निमणी, ता. तासगाव, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो पूर्वी गुजरात येथील बिल्ली मोरा नवसारी या ठिकाणी राहत होता. त्यावेळी त्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती.
सोनू रामतेज कुशवाह (वय 28, रा. साधूवासवाणी ब्रिजखाली, बार्टीजवळ, क्विन्स गार्डन, मूळ. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना 18 एप्रिल रोजी घडली होती. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत ब्लू डायमंड ते सर्किट हाऊस या रस्त्यावर साधूवासवानी रेल्वे ओव्हरब्रिज आहे. बार्टी कार्यालयाच्या बाजूला ब्रिजखाली झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमध्ये साधूवासवानी मिशनतर्फे गरीब, भिक्षुक लोकांना अन्नदान केले जाते. या झोपडपट्टीसमोरील साई मंदिराच्या कठड्यावर कुशवाह 3 ते 4 महिन्यांपासून राहत होता. त्या ठिकाणी शिवा नावाची व्यक्ती जात होती. त्यामुळे दोघांची आणि वस्तीतील लोकांची ओळख होती. शिवा हा साधुवासवाणी मिशनतर्फे मोफत देण्यात येणारे अन्न घेण्यासाठी गेलेल्या लोकांना दमदाटी करत. त्यांच्याकडून पैसे घेत असत. त्यावेळी तु गरिबांना दमदाटी करून त्रास का देतो, अशी विचारणा कुशवाह याने सोनूला केली. त्यामुळे दोघात वाद झाला. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन शिवा निघून गेला. घटनेच्या दिवशी कुशवाह मंदिराच्या कठड्यावर झोपला होता. त्यावेळी डोक्‍यावर कोणत्यातरी हत्याराने वार करून शिवा याने कुशवाह याचा खून केला. या प्रकरणात घटना घडल्यापासून शिवा फरार होता. शिवा जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यावेळी पोलीस नाईक विनोद साळुंके आणि शिपाई अनिल मंदे यांना जेजुरी येथे पाठविण्यात आले. त्यावेळी दोघांनी त्याच्या ठावठिकाणाची माहिती काढली. अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, परिमंडळ 2 चे पोलीस उपआयुक्त प्रवीण मुंढे, लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक प्रशांत लंघे, कर्मचारी दिनेश शिंदे, विनोद साळुंके, अनिल मंदे, संदीप गायकवाड यांनी जेजुरी येथे सापळा रचून शिवा याला अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)