खूनप्रकरणी परप्रांतीय युवकाला जन्मठेप

चार वर्षांपूर्वीची घटना ; गणपती विसर्जन मिरवणुकीत गोळी झाडून केला होता खून

सातारा,दि.15(प्रतिनिधी)

चार वर्षांपूर्वी शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत गाणी लावण्यावरून झालेल्या वादातून एका युवकाचा बंदुकीतून गोळी झाडून खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुख्य संशयित रामआशिष रामरजतन यादव (सध्या रा. जुनी एमआयडीसी, मूळ रा. उत्तर प्रदेश ) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे. याच खटल्यातील इतर आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , सन 2012 साली जुनी एमआयडीसी परिसरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती . मृत गोविंद व संशयित आरोपी हे एकाच मंडळातील कार्यकर्ते होते. दरम्यान मिरवणूक आरोपी रामाशिष यादव याच्या घरासमोर आली तेव्हा त्याने माझ्या घरासमोर दोन गाणी लावा अशी विनंती केली होती. त्याच्या घरासमोर दोन गाणी झाल्यानंतर मिरवणूक पुढे निघाली असताना, यादव याने भोजपुरी गाणी लावण्याचा हट्ट धरला होता. मात्र वेळेअभावी गाणी लावता येणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर चिडलेल्या राम यादव याने स्वतःकडील बंदुकीतून हवेत गोळीबार केला होता.

त्यानंतर त्याने दुसरी गोळी गोविंद साळंखे यांच्या दिशेने झाडली होती. ती गोळी साळुंखे यांच्या पोटाला लागल्याने साळुंखे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र साळुंखे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर गोविंद यांचा भाऊ नामदेव दत्तात्रय साळुंखे यांनी राम आशिष यादव व इतर संशयितांच्या विरोधात दि.29 ऑक्टोंबर 2012 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.  गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या खटल्यात न्यायालयात दहा साक्षीदार तपासण्यात आले . त्यानंतर सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती आर डी देशपांडे यांनी आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅडव्होकेट महेश कुलकर्णी, पोलिस प्रॉसिक्युशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कबुले, सहाय्यक फौजदार रुपचंद वाघमारे, हवालदार अविनाश पवार,कांचन बेंद्रे, क्रांती निकम, अजित शिंदे यांनी काम पाहिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)