खुल जा सिम सिम

राजा विक्रमने आपला हट्ट सोडला नाही व तो सभागृहातून तणतणतच बाहेर पडला. विरोधक चक्क मला राजीनामा मागताहेत म्हणजे काय? एवढा पारदर्शक आणि क्रांतिकारी कारभार दिला, तीन वर्ष कुठे बोट ठेवायला जागा दिली नाही. अन्‌ आता मात्र “पिंजरा’ मधील मास्तरवर आली तशी वेळ आली. पूर्ण गावाला शहाणे करण्याची भीष्म प्रतिज्ञा केलेल्या मास्तरच्या हाती तुणतुणे घेऊन रंगमंचावर कोपऱ्यात उभे राहण्याची वेळ आली म्हणजे काय? कुठे चुकले, कुणाचे चुकले, नेमका कुठे व कुणाचा पाय घसरला, हा विचार करून कवटीची शंभर शकले होतात की काय, असे क्षणभर वाटले. आपलेच काही साथीदार या गैरव्यवहाराच्या आत्मघातकी “ब्लु-व्हेल’ च्या जाळ्यात कसे बरे अडकले असावेत? वेताळाने राजाची अवस्था ओळखली व मदत करण्याच्या हेतूने राजाच्या खांद्यावर टुनकन उडी मारून बसला.
“राजा, फार चिडलेला दिसतो आहेस. स्वतःवर की सहकाऱ्यांवर? ‘
“वेताळा, माफ कर, पुढे जा.’
“राजा, पुढे जा म्हणजे? तू राजा असलास तरी मी भिकारी नाही! आणि ही काय अवस्था केलीस स्वतःची? अगदी “पिंजरा’ मधल्या डॉक्‍टर श्रीराम लागूंसारखी?’
“बरोबर बोललास वेताळा. शाळा उघडली, पण तमाशा सुरू झाला रे.’
“हा हा हा! अपडाऊन चालायचेच राजा. उन व सावली, प्रकाशानंतर अंधार यायचाच…!’
“उपदेश पुरे वेताळा. क्‍लायमॅक्‍स चुकणार वाटतं रे. का झाले असावे असे?’
“राजा, शांत हो! एक गोष्ट कान देऊन ऐक. कासीम नावाचा एक गरीब मेंढपाळ रहात असे. घरी 18 विश्वे दारिद्रय. एके दिवशी मेंढ्या चरण्यासाठी डोंगरावर जातो. तिथे त्याला एक गुहा दिसते. “तीळा तीळा दार उघड’, असे म्हणताच त्या गुहेवरचा दगड सरकतो व कासीमला आतला खजिना दिसतो. कासीम त्याला आवश्‍यक तेवढे द्रव्य घेतो व घरी परततो. त्याच्या बदललेल्या परिस्थितीचे कारण त्याच्या भावाला कळते व तो सुद्धा खजिना घ्यावयास जातो. आतले दृष्य पाहून त्याला हर्षवायू होतो व आनंदाच्या भरात तो गुहा उघडायचा मंत्र विसरतो व आतमध्ये अडकून बसतो.’
“पुढे काय होते वेताळा? मला पटकन सांग!’
“राजा, गोष्ट संपली!’
“तुला काय म्हणावयाचे आहे वेताळा ‘
“राजा, अरे सत्ता ही खजिन्याच्या गुहेसारखीच आहे. इथे कासीम काय किंवा कासीमचा भाऊ काय सारे सारखेच. कासीमला बाहेर येणे जमले. त्याचा भाऊ मात्र अडकून बसला.’
“बरं मग? तुला काय सुचवेयचेय वेताळा?’
“राजा, तू सुज्ञ आहेस. तुझ्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना जमले, तुला नाही एवढेच! तू मंत्र विसरलास व अडकून बसलास; आनंदाच्या भरात तुझे सहकारी आत तर गेले पण “तीळा तीळा दार उघड’ म्हणायचे विसरले.’
“वेताळा, थांब तुझी खोडच मोडतो आज. तू विरोधकांना सामील झालास होय रे लब्बाडा? थांब तुझ्या कवटीची शंभर शकले करतो मी! असे म्हणत राजा तलवार उपसून वेताळा मागे धावतो, वेताळ ही हसतच एक सुर मारून दिसेनासा होतो.’
– धनंजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)