खुले की एकतर्फी प्रेम? (अग्रलेख)

“भाजपाचे शिवसेनेवर एकतर्फी प्रेम आहे, हा आरोप खरा नाही. शिवसेनेचेही भाजपावर तेवढेच प्रेम आहे. आम्ही प्रेम जाहीरपणे आणि खुलेपणाने व्यक्‍त करतो, तर शिवसेना आमच्यावर लपून प्रेम करते’, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शनिवारी केला आणि आगामी निवडणुकांमध्ये युती होणारच असा विश्‍वासही व्यक्त केला. राज्यात आणि केंद्रात सत्तेत भागीदार असलेले शिवसेना आणि भाजपाचे नेते ज्या पद्धतीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत, ते पहाता त्यांच्यात आता युती होईल का, असा प्रश्‍न पडलेला असतानाच फडणवीस यांनी हे विधान केले आहे. यापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करताना “युती होणारच’ अशी खात्री व्यक्‍त केली होती. “पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर युतीबाबतच्या घटनांना वेग येईल.

शिवसेना आणि भाजपमध्ये भेटीगाठी सुरू आहेत. भाजप-शिवसेना युती करायचीच आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा कोणत्याही प्रकारे फायदा होऊ नये, अशी इच्छा असेल. जागावाटप समजुतीने होऊ शकेल’, असे सांगताना पाटील यांनी “जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरु शकतो,’ असेही संकेत दिले आहेत.भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी शिवसेनेच्या दिशेने पुढे केलेला हात पाहिला असता भाजप शिवसेनेवर खुलेपणाने प्रेम करते असे मानायला हरकत नाही. पण शिवसेनेचे भाजपवर प्रेम आहे का आणि ते प्रेम लपून केले जात आहे का हा मात्र संशोधनाचा विषय ठरु शकतो. केवळ राजकीय अपरिहार्यतेतून भाजप सतत शिवसेनेच्या प्रेमाचे गोडवे गात असले, तरी हे प्रेम एकतर्फी असण्याचीच शक्‍यता नाकारता येत नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रेमाला कोणताही प्रतिसाद न देता सतत स्वबळाची भाषा करीत आहेत. कोणत्याही व्यासपीठावर ते स्वबळावर निवडणूक लढवण्याचीच घोषणा करीत असतात. कारण त्यांचा आता भाजपवर विश्‍वास राहिलेला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते गेले काही महिने युतीची खात्री देत असले, तरी शिवसेनेला रोखण्याचीच भाजपची मानसिकता अनेकवेळा समोर आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडताना आणि नंतर मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढताना भाजपची ही मानसिकता स्पष्ट झाली होती. त्यामुळेच ठाकरे राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत जाऊन पक्षाची मोर्चेबांधणी करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आयत्या वेळी युती तोडली ही सल शिवसेनेच्या मनात कायम आहे. त्यामुळेच सध्या भाजपचे नेते युतीची इच्छा व्यक्‍त करत असले तरी त्यांच्यावर आंधळा विश्‍वास ठेवायचा नाही, हे शिवसेनेचे धोरण कायम आहे.

शिवसेनेने भाजपला “मोठा भाऊ’ मानावे ही भाजपची मानसिकताही शिवसेनेला मान्य नाही. कारण बिहारमध्ये एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढे खासदार असणाऱ्या संयुक्‍त जनता दलाशी युती करताना भाजपने निम्म्या जागा सोडून दिल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी शिवसेनेशी युतीचा प्रस्ताव ठेवताना भाजप सन्मान ठेवण्याची मानसिकता दाखवावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत भाजपला गृहीत धरायचे नाही, असे शिवसेनेचे धोरण आहे. साहजिकच शिवसेनेचे भाजपवर छुपेही प्रेम असण्याची शक्‍यता नाही. विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपचे नुकसान होते, हे उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाल्याने आणि राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याची चिन्हे दिसत असल्यानेच सत्ताधारी भाजपकडून शिवसेनेपुढे युतीसाठी सातत्याने हात पुढे केला जात आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आघाडीसाठी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटकात कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे दोन पक्ष एकत्र आल्याने पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातही मताधिक्‍य घटले.

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने सत्ताधारी भाजपला फटका बसला होता. महाराष्ट्रातील गोंदिया-भंडारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत भाजपचा पराभव केला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने बसपा, समाजवादी पार्टी, डावे पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा विविध समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही आघाडीत सहभागी व्हावे, असा प्रयत्न होत आहे. सर्व समविचारी पक्षांची महाआघाडी अस्तित्वात आल्यास भाजपला राज्यात कडवे आव्हान उभे राहणार आहे.अशा प्रकारे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांची आघाडी होणार हे जवळपास निश्‍चित असल्याने भाजपचे नेते सावध झाले आहेत.विरोधी पक्षांची महाआघाडी झाली आणि भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते याची भाजपला जाणीव आहे.

देशात इतरत्रही गेल्या एक-दीड वर्षांत ज्या ज्या वेळेस समविचारी पक्षाची आघाडी झाली त्या त्या वेळेस भाजपला अडचणीचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातही चित्र काही वेगळे नाही. भविष्यात सत्ता टिकवायची असेल तर भाजपला मित्रपक्षाची साथ गरजेचीच आहे. त्यामुळेच शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. भाजपला आगामी निवडणुकीत विजय संपादन करायचा असेल तर महाराष्ट्रात तरी शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे माहीत असल्यानेच, आता शिवसेनेवरील प्रेमाची पुन्हा-पुन्हा कबुली द्यावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)