खुर्चीचा महिमा

पुण्यामध्ये संगीताचे कार्यक्रम नेहमीच होतात. अशाच एका कार्यक्रमासाठी मी हलवर पोहोचले. कार्यक्रमाला गर्दी बरीच होती आणि थोडी उशिरा गेल्याने मला एकही खुर्ची रिकामी दिसत नव्हती. कार्यक्रम विनामूल्य असल्याने आधी आलेल्यांनी जागा मिळविली होती. मी थोडा वेळ उभा राहूनच कार्यक्रम ऐकला पण एका व्यक्तीने मला बोलावून मला तिची खुर्ची बसावयास दिली. कारण फोन आल्यामुळे त्यांना लवकर निघावे लागत होते. मी धावत जाऊन त्यावर स्थानापन्न झाले. आणि हुश्‍श्‍य केले. नाही म्हटले तरी उभे राहून गाणे ऐकणे जरा अशक्‍यच होते. त्या गृहस्थांचे मी मनोमन आभार मानले. तर अशी ही खुर्ची मिळविण्याची धडपड.

कुठेही आपले बस्तान बसवायचे तर या “खुर्चीला’ फार महत्त्व आहे बरे. अगदी घरातसुद्धा जेवायला बसायची आपली खुर्ची नकळतपणे ठरलेली असते. घरामध्ये, ऑफीसमध्ये, दवाखान्यामध्ये, एखाद्या हॉलमध्ये, नाट्यगृह व सिनेमागृहामध्ये आणि संसदेमध्येही या खुर्च्यांचेच राज्य असते. अशा सर्व”व्यापी’ खुर्चीबद्दल प्रत्येकाच्या मनांत एक सुप्त इच्छा असते. ती “खुर्ची’ मिळविण्याची.

घरामध्ये फारसा फरक पडत नाही. लाकडी नाहीतर प्लॅस्टिकची तरी खुर्ची असतेच बसायला. लेखन आणि वाचनाची आवड असेल टेबल आणि खुर्चीही हवीच. पण बहुतेक घरामध्ये अशी एखादी जुनी आरामखुर्ची असते. त्यावर जुन्या पिढीतले लोक म्हणजे आपले वडील, सासरे बसत असतील त्याच्या आठ”णी दडलेल्या असतात. त्या खुर्चीला म्हणताना सुद्धा ती “दादांची खुर्ची’ असे आपण सहजपणे म्हणतो व तसेच तिचे नामकरणही करतो.

ऑफीसमधल्या खुर्चीला मात्र अनन्य साधारण महत्त्व असते. त्यावर आपले भवितव्य अवलंबून असते. सुरुवातीला जरी खालच्या पदाच्या खुर्चीवर आपण बसलो तरी आपले लक्ष मात्र बॉसच्याच खुर्चीकडे असते व ती मिळविण्यासाठी सर्वजणच प्रयत्नशील असतात. बॉसची खुर्ची ही काटेरी असते हे माहीत असूनसुद्धा ते काटे सोसण्याची आपली तयारी असते.

दवाखान्यातल्या खुर्च्या मात्र उगाचच उदास वाटतात. त्यावर बसून डॉक्‍टरांची वाट पाहणे किंवा आपल्या एखाद्या रिपोर्टची वाट पाहणे फार कठीण असते. थोड्या वेळाने ती खुर्ची टोचते आहे असे वाटते. डॉक्‍टरांसमोरची खुर्ची ही अशीच असते. स्वतःच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या एखाद्या जीवघेण्या आजाराची कल्पना जेव्हा डॉक्‍टर आपल्याला देतात तेव्हा नकळत आपण, आपम बसलेल्या खुर्चीचा हात घट्ट धरतो.

नाट्यगृह व सिनेमागृहातील खुर्च्या मात्र आरामशीर व आनंददायी असतात. अंधारात आणि चाचपडतच आपण जेव्हा आपल्या एल 15, 16 किंवा बी 17, 18 पर्यंत पोचतो तेव्हा विजयी झाल्यासारखे वाटते. शेजारी कोण आहे हे आपण नकळतपणे पाहतो आणि पुढील तीन तासांसाठी आपल्याला इथून कुणीही उठवणार नाही म्हणून पाय लांब करून आरामात बसतो.

अशी समोरच्या पडद्यावर किंवा स्टेजवर चालू असलेला सिनेमा किंवा नाटक त्या खुर्चीवर आपल्याला खिळवून ठेवले ते आपल्यालाच कळत नाही आणि मग त्या आनंदातच आपण ती आपली 300 रु. देऊन घेतली 3 तासांची खुर्ची दुसऱ्या कुणाला तरी आनंद देण्यासाठी रिकामी करतो.

संसदेमध्ये चाललेली सर्व धडपड ही फक्त “खुर्ची’साठीच असते. या राजकारणी लोकांच्या खुर्चीला फारच महत्त्व असते. त्यामुळे ती मिळविण्यासाठी आमि मिळविल्यावर टिकवण्यासाठी माणसं पराकाष्ठा करतात. त्या खुर्चीवरूनच माणसं बदलतात, स्पर्धा करतात, तारतम्य भाव विसरून वागतात.

या खुर्चीपासून सामान्य माणसांनी लांब राहणेच श्रेयस्कर.
शाळांमध्ये मात्र शिक्षकांच्या खुर्चीला मान असतो. तसा कोर्टामध्ये जज्जच्या खुर्चीला. त्यावर दुसरे कोणी बसतदेखील नाही. मुख्याध्यापकपदाची खुर्ची तर सर्व शिक्षकांना खुणावत असते. पण विद्यार्थ्यांच्या मनात या खुर्चीबद्दल आदरभाव असतो.

तर अपंगांसाठी बनवलेली व्हील चेअरही त्यांचं आयुष्य असते. त्या फिरत्या खुर्चीमुळे त्यांना हे सुंदर विश्‍व बघण्याची संधी मिळते. दुसऱ्या कुणाच्याही खुर्चीवर न बसण्याचा एक अलिखित संकेत असतो. तो आपण सूज्ञ लोक पाळतोच. पण योग्यवेळी आपल्या खुर्चीवरून उठून जाणे व ती दुसऱ्यासाठी मोकळी करणे यातच शहामपण आहे.

आरती मोरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)