खुनातील फरार आरोपी चार वर्षांनी अटक

कोल्हापुरातून ताब्यात ः पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
लोणी काळभोर  -चार वर्षांपुर्वी हॉटेलमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ भाडणाचे पर्यावसन मोठ्या वादात झाले. यामध्ये एकाचा गावठी पिस्तुलमधून गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यातील एकास अटक करण्यात आली होती. घटना घडल्यापासून फरार असलेल्या एकास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने कोल्हापूर येथे सापळा रचून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अमर उर्फ अमरदीप बाजीराव बनसोडे ( वय 28, रा. चव्हाणवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यास अटक करण्यात आली आहे. 21 जुलै 2013 रोजी रात्री 11 वाजण्याचे सुमारास खराबवाडी, चाकण (ता. खेड) येथील हॉटेल अथर्व परमिट रूम व बिअर बार या हॉटेलमध्ये दारू पिण्यास आलेल्या मित्रामध्ये झालेल्या भांडणात नितीन लक्ष्मण विरणक (वय 25, रा. तळेगाव दाभाडे स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) यास गावठी पिस्टलमधून छातीमध्ये गोळ्या घालून ठार करून आरोपी हे स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज त्यावेळी सोशल मिडीयावर व्हायरल झालेले होते. गुन्ह्यातील एक आरोपी आकाश भालेराव (रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) यास पोलिसांनी नाकाबंदीमध्येच पकडले होते; परंतु इतर आरोपी फरार झालेले होते. अटक आरोपी भालेराव हा सध्या येरवडा कारागृहात आहे.
गुन्ह्यात फरारी झालेल्या आरोपींपैकी अमर उर्फ अमरदीप बाजीराव बनसोडे हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या गावी व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला; परंतु तो वारंवार नाव पत्ता बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलीसापुढे आव्हान होते. जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी रेकॉर्डवरील फरारी पाहीजे आरोपी पकडणे कामी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक नेमले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, विद्याधर निचित, महेश गायकवाड, निलेश कदम, रवि शिनगारे, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने वरील खुनाचे गुन्ह्यातील फरारी असलेल्या आरोपीची माहिती काढून त्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथून सापळा लावून ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी चाकण पोलीस ठाण्यात हजर केले आहे. बनसोडे यास खेड कोर्टापुढे हजर केले असता त्यास 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मनोजकुमार यादव हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)