नारायणगाव-नारायणगाव पोलीस ठाण्यात तीन पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एकावर पोलिसांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
प्रियेश उर्फ सोन्या वसंत भोर (वय 26, रा. शिवविहार सोसायटी, शिवतेज बिल्डिंग नारायणगाव, ता. जुन्नर) याला तडीपार करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार भोर याच्यावर मारामारी, गंभीर दुखापत करून जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे तीन पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये जुन्नर आंबेगाव उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भोर याला जुन्नर आंबेगाव तालुक्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासंदर्भात गोरड म्हणाले की, गंभीर गुन्ह्यांमुळे भोर याच्यावर पहिली तडीपारीची कारवाई आहे.
या पुढील काळात नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही सातत्याने गंभीर प्रकारचा गुन्हा केल्याचे आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही. त्यावर तडीपारीची कारवाई होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविले जातील, असा इशारा गोरड यांनी दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा