खासदारांनी विकासापासून पळ काढला

दिलीप वळसे पाटील : पिंपळगाव खडकीत डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ कोपरा सभा

मंचर- खासदारांनी गेल्या पाच वर्षांत पेव्हींग ब्लॉंक आणि घंटागाडी देण्यातच आपला कार्यकाल पूर्ण केला. पेव्हींग ब्लॉंक आणि घंटागाडी देण्यासाठी ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद सदस्य सक्षम आहेत. खासदारांना अजुन कोणती कामे केली पाहिजेत याबाबत ते अनभिज्ञ आहेत. खासदारकीचा कार्यकाल विकासकामांऐवजी टीका आणि दिशाभुल करण्यातच गेला. विकासकामे केली नसल्यामुळे खासदार आता नवीन शक्‍कल लढवत चारित्र्यसंपन्न उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर तोंडसुख घेण्याचे काम करतात. विकासापासून पळ काढल्याने त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणताही विकासाचा प्रभावी मुद्दा नसल्याने मतदाराच त्यांचा पराभव करतील, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी आयोजित केलेल्या कोपरा सभेत वळसे पाटील बोलत होते.

यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, तालुका युवकचे अध्यक्ष निलेश थोरात, बाबुराव बांगर, तुकाराम बांगर, उद्योजक दत्ताशेठ बांगर, ज्ञानेश्‍वर पोखरकर, रामनाथ बांगर, संगीता पोखरकर, कुंडलिक बांगर, धोंडीभाऊ बांगर, पंढरीनाथ पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले की, खासदार झाल्यानंतर आढळराव यांनी किती लोकांना रोजगार दिला. केवळ दिशाभुल केली त्यामुळे मतदार आता फसणार नाही. आढळरावांचा त्रिफळा मतदारच उडवतील, अशी टीका त्यांनी केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मथाजी पोखरकर, संतोष पोखरकर, पोपट बांगर, अश्‍विनी पोखरकर, रामदास गंगाराम बांगर आदींची भाषणे झाली.

  • मतदारांनी भावनिक मुद्‌द्‌यांवर मतदान न करता विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करावे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील विकासकामांचे जनक आहेत. त्यांनी आधी विकासकामे केली आहेत. मगच ते मते मागण्यासाठी येतात.
    – देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद बॅंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)