खासदारांचा आदेश…मग डॉल्बी वाजलीच पाहिजे

सातारा – खा.उदयनराजे आणि वाद्य हे एक समीकरणच. त्यामध्ये बंदी घालण्यात आलेली डॉल्बी देखील अपवाद नाही. नुकत्याच साताऱ्यात झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी ही वाजलीचे पाहिजे, असा आदेश त्यांनी जाहीर केला अन उपस्थित युवकांनी खासदारांच्या आदेशाला समर्थन देत एकच जल्लोष केला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी ही वाजणारच हे आता अंतिम झाले आहे.

साहजिकच खासदारांच्या आदेशामुळे जसा उपस्थित युवकांनी जल्लोष केला तसाच साताऱ्यातील नागरिकांचा आनंद व्दिगुणीत व्हायलाच हवा. कारण अखेरचा आदेश दस्तरखुद्द खासदारांनी दिला आहे. कारण, सातारा म्हणजे नो एसपी…नो कलेक्‍टर ..ओन्ली ऍण्ड ओन्ली उदयनराजे हा डायलॉग कोणी विसरता कामा नये. तसाच अजून एक खासदारांचा आवडता डायलॉग म्हणजे, एक बार जो मैने कमिटमेंट कर दी… तो मै खुद की भी नही सुनता. ह्या सर्व डायलॉगचे व्हिडीओ यु ट्युबवर आहेत. ते जिल्ह्यात आलेल्या नव्या अधिकाऱ्यांनी वेळीच बघून घ्यावेत. कारण, यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी ही वाजणारच अशी गर्जना खासदारांनी केली आहे.

खरे तर साताऱ्यात चार-पाच वर्षापुर्वीपर्यंत गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणूकांमध्ये डॉल्बीचा समावेश असायचा. डॉल्बीमुळे मिरवणूकांमध्ये युवकांचा आणि त्यामध्ये विशेषत: सुशिक्षित युवकांच्या सहभागाचे प्रमाण अधिक होते. मात्र, अचानक विसर्जन मिरवणूकी दरम्यान राजपथावर एक जिर्ण इमारत कोसळली. त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. मात्र, त्याचे खापर डॉल्बीवर फोडण्यात आले. त्यावेळी सांगण्यात आले की, डॉल्बीच्या दणदणाटामुळे इमारत कोसळली.तेव्हापासून मिरवणूकांमध्ये डॉल्बीवर बंदी घालण्यात आली अन मिरवणूकांमध्ये पारंपारिक वाद्येच वाजविणे बंधनकारक करण्यात आले आणि मिरवणूकांमधील उत्साह जणू कमीच झाला.

खरे तर इमारत जिर्ण झालेली असताना डॉल्बीवर खापर फोडणे योग्य नव्हते आणि त्या लोकांनी देखील अशा इमारतींखाली कशाला थांबावे ना ? असा प्रश्‍न पडतो. मात्र, आता डॉल्बीप्रेमींच्या मदतीला खासदार धावून आले आहेत. ते 18 लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करतात. आता त्यांनीच डॉल्बी वाजणारच हा आदेश दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी ही वाजलीच पाहिजे. आणि डॉल्बीमुळे त्रास होतो असे तुणतुणे वाजविणाऱ्या रूग्णालये, विद्यार्थी वसतिगृहांनी आता साऊंड प्रुफ सिस्टिीम बसवून घ्यावी, वृध्द व लहान मुलांना आवाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी एक दिवस पै-पाहुण्यांकडे जावून रहावे. मोजक्‍या लोकांच्या त्रासासाठी डॉल्बीवरच बंदी ? हा डॉल्बीप्रेमींवर घोर अन्याय आहे. तसेच गणेशोत्संवांच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती आणि विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे आवाहन केले जाते. हे साफ चुकीचे आहे. खरेतर हा उत्सव आहे. नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी देतात.

त्यामुळे उत्सव हा उत्सवासारखाच व्हायला पाहिजे ना ? मग डॉल्बीवर खर्च केला तर बिघडले कुठे ? राहिला प्रश्‍न पोलीसांनी आदेश देवून ही डॉल्बी वाजविण्याचा. यंदाच्या वर्षी खासदारांनी आदेश दिलाय. त्यामुळ डॉल्बी ही वाजणारच. करायच्या तेवढे गुन्हे दाखल करा. आम्हाला कुठं नोकऱ्या करायच्या आहेत आणि कुठं पोलीसांकडून चारित्र्य पडताळणी दाखला घ्यायचा आहे. खुशाल गुन्हे दाखल करा. मंडळांच्या नोंदणी रद्द करा. डॉल्बी ही वाजणारच. कारण आता आदेश खासदारांचा आहे. आता खासदारच मंडळांच्या पाठीशी आहेत त्यामुळ चिंता करण्याचे कारण नाही. कारण खासदारांना 18 लाख मतदारांनी निवडून दिलयं. त्यांचा आदेश हा मान्य केलाच पाहिजे. भले शहरातील खड्डे मुजले नाही तरी चालतील, अतिक्रमणांमुळे लोकांना जीव धोक्‍यात घालून रस्त्यांवरून चालावे लागले तरी चालेल, भले नोकऱ्या करायला पुण्याला जावे लागले तरी चालेल आणि हो जाताना भले टोल भरावा लागला तरी चालेल. आणि तुम्ही म्हणाल, मेडीकल कॉलेजची मान्यतेचा प्रश्‍न दिल्लीत अडकलाय तर तो गणेश विसर्जनानंतर बघितला जाईल.

जिल्हा रूग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्‍टर्सची कमतरता आणि सिटी स्कॅन मशिन हा नित्याचा विषय आहे. दुसरा राहिला प्रश्‍न धरणग्रस्तांच्या पुनर्वसनांचा. तो प्रश्‍न काय अत्ता निर्माण झालाय का ? गेल्या 50 वर्षापासूनचा तो प्रश्‍न आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे ही तसेच आहे. त्यासाठी अत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी काय केले हा प्रश्‍न डॉल्बीला विरोध करणाऱ्यांनी विचारा. अत्ताशी आमची लोकसभेची दुसरी टर्म आहे. उगाच विषयांतर करून यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीला विरोध करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, कारण आदेश दस्तुरखुद्द खासदारांचा आहे.

डॉल्बीचा आणि घरच्यांचा काय संबध ?
गणेश विसर्जनात डॉल्बीला परवानगी हवी असेल तर अगोदर आपल्या आई व बहिणीचे पत्र आणा, असे विधान लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. त्यामुळे डॉल्बीप्रेमींना धक्काच बसला. खरे तर डॉल्बीचा आणि घरच्यांचा काय संबध ? काही ही विधाने जिल्हाधिकारी करत असतील तर ह्या समाजाचे होणार तरी कसे हा प्रश्‍न निर्माण होतो.

जिल्हाधिकारीयांनी त्यांना नेमून दिलेलेच काम केले पाहिजे. जी. श्रीकांत यांनी यापुर्वी सातारा जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांना साताऱ्याच्या खासदारांचा स्वभाव माहित आहे. आता खासदारांनीच डॉल्बी वाजलीच पाहिजे हे सांगितले आहे. त्यामुळे श्रीकांत यांनी सातारा पॅटर्न लातूरात राबवलाच पाहिजे, उगाच डॉल्बीच्या विषयात घरच्यांना मध्ये आणणे योग्य नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)