खासगी शाळांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवा

पालकांची मागणी : प्रवेशाची माहिती होत नसल्याने त्रस्त

पुणे – शहरात नर्सरी तथा बालवाडी प्रवेश डिसेंबर महिन्यात सुरू होत असतात. ख्यातनाम खासगी शाळांकडून कोणत्याही दिवशी प्रवेश सुरू होतात, ती माहिती प्राप्त होण्यास बराच कालावधी संपून जातो. त्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी आपल्या पातळीवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

-Ads-

पुण्यातील नर्सरी तथा बालवाडी प्रवेशाचा हंगाम ऐन थंडीच्या दिवसात अर्थात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सुरू असतो. काही दिवसांत पूर्व प्राथमिकचे प्रवेश सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, बहुतांश पालकांना कोणत्या शाळेत कधी प्रवेश सुरू होणार आहेत, अर्ज करण्यासाठी किती कालावधी आहे, प्रत्यक्ष प्रवेश कधी घ्यायचा आहे, याची कोणतीच माहिती पोहोचत नाही. बहुधा संबंधित खासगी शाळेतील पहिल्या पाल्याचे प्रवेश झाले असतील, त्याच पालकांना प्रवेशाची सविस्तर माहिती असते, असे चित्र पाहावयास मिळते.

शहरातील ख्यातनाम खासगी शाळा गुणवत्तेसाठी आग्रह असतात. गुणवत्तेसाठी पुढाकार घेणाऱ्या शाळा मात्र प्रवेशासाठी ऑनलाइन तंत्राचा उपयोग करीत नाही, हेच अधोरेखित होत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञानाचा मोठा गवगवा होत आहे. मात्र बहुतांश खासगी शाळांची स्वत:ची वेबसाईट नाही. काही शाळा अन्य कारणांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर सर्रास करतात. मात्र ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवित नाहीत, याकडे काही पालकांने लक्ष वेधले आहे.

पालकांच्या रात्री रांगा थांबतील…
शाळांनी आपल्या स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबवितात. त्यामुळे पालकांना रात्रीचा दिवस करून रांग लावावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. ही पद्धत बंद होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अंगिकार शाळांनी केला पाहिजे. तसेच काही शाळा प्रवेशासाठी दोन-तीन दिवसच अर्जासाठी कालावधी देतात. त्याऐवजी अर्जासाठी किमान आठ दिवसांची मुदत देऊन विक्री व्हायला हवी. नर्सरी प्रवेशासाठी शाळा आपल्या मनमानी पद्धतीने अर्जाची किंमती ठरवित असतात. त्यावर निर्बंध असले पाहिजे, अशी अपेक्षा रजनीकांत धाडवे या पालकाने व्यक्‍त केली.

अकरावी प्रवेशप्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने होत आहे. तसेच, शिक्षण हक्‍क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राखीव कोट्यातील 25 टक्‍के आरक्षित प्रवेश शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. त्याच धर्तीवर खासगी शाळांतील सर्वच प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे. त्याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

– राजेंद्र धारणकर, अध्यक्ष, सिस्कॉम संस्था

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)