खालुंब्रे हद्दीत मुरूम माफियांचा धुमाकूळ

  • पडीक जागेवर भरावाचे काम वेगात : कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

महाळुंगे इंगळे  – उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राजरोस मुरुमाची चोरी होत असल्याचे प्रकार सर्रास वाढले आहे. खालुंब्रे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एमआयडीसी फेज – 2, प्लॉट नं. के – 20/ के – 22 , स्कोन कंस्टरकशन कंपनीच्या समोरील पडीक जागेवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा भरावाचे काम सुरु आहे. या जागेत असेलला ओढा देखील संबंधितानी बुजविण्याचा घाट घातला असून, याबाबत सखोल चौकशी करून संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नरेंद्र वाळूंज यांनी खेडच्या तहसीलदारांकडे केली आहे.
चाकण उद्योग पंढरीतील एमआयडीसी भागात खूप मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या कंपन्या व कारखान्यांची बांधकामे वेगात सुरु आहेत. त्यामुळे त्यांची पायाभरणी व रस्ते कामांच्या मजबुती करणासाठी हजारो ब्रास मुरुमाची आवश्‍यकता असते. त्यासाठी ठीकठिकाणच्या माळरानामध्ये जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून कोणतीही रॉयल्टी न भरता तसेच वाहतूक परवाना न घेता डंपरच्या सहायाने मुरूम पुरवठा केला जात आहे. जेसीबी मशीन आणि डंपरच्या माध्यमातून एका-एका रात्रीत हजारो ब्रास मुरूम गायब केला जात आहे. या धंद्यात अनेक राजकीय पक्षांची मंडळी कार्यरत आहेत. त्यांच्याकडूनच एकमेकांच्या काळ्या धंद्याची माहिती प्रशासनाकडे पोहोचविली जाते.
डोंगर, टेकड्या पोखरून निर्ढावलेले उंदीर आता थेट जमिनीच्या पोटात शिरू लागले असून, सर्वच मुरूममाफियांना कारवाईच्या कात्रीत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या मुरूममाफियांबरोबर कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता खालुंब्रे हद्दीतील एमआयडीसी फेज – 2, प्लॉट नं. के – 20/के – 21, के – 22, स्कोन कंपनीच्या समोर खूप मोठ्या प्रमाणावर रातोरारात भरावाचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे या जागेत असलेला ओढा देखील बुजविण्यात आल्याची तक्रार नरेंद्र संभाजी वाळूंज यांनी खेडच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची चौकशी करून संबधित मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे, खालुंब्रे भागात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला मुरूम माफियांचा धुमाकूळ रोखण्यासाठी संबधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)