खालुंब्रेत एचपी चौकात उड्डाणपुलाची गरज

वाकी-वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस वाढत चाललेली रहदारी यामुळे रस्ते अपुरे पडत चालले आहेत. चाकण – तळेगाव दाभाडे या राज्यमार्गावर खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीतील एचपी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने कोंडी होत आहे. त्याठिकाणी रस्ता रुंदीकरणासह मोठा उड्डाणपूल बांधण्यात यावा, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरण या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे यांनी दिला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील खालुंब्रे या गावच्या हद्दीत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे याठिकाणी कामासाठी येणाऱ्या कामगारांची संख्याही त्या तुलनेत मोठी आहे. चाकण – तळेगाव दाभाडे या राज्य मार्गावर खालुंब्रे हे महत्त्वाचे गाव आहे. या गावच्या हद्दीत एचपी चौक असून, त्याठिकाणी अखंडपणे वाहतूकीचा खोळंबा झालेला असतो. पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात याठिकाणी पुढील वाहनास धडकून अनेकदा मोठे अपघात झाल्याने अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. हा रस्ता अत्यंत कमी रुंदीचा असल्याने रुंदीकरणासह या चौकात मोठा उड्डाणपूल बांधण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विशाल तुळवे यांनी केली आहे.
रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवासी, वाहनचालक, महाविद्यालयीन युवती या खराब रस्त्यामुळे अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. त्यात एचपी चौकातून पुढे खालुंब्रे गावाकडे जाताना असणारे नागमोडी वळण अत्यंत धोकादायक असून, वेगात येणाऱ्या वाहनाचा केव्हा अपघात होईल, याचा भरवसा नाही. वाढते अपघात, वाहतुकीचा वारंवार होणारा खोळंबा रोखण्यासाठी नव्याने उड्डाणपूल बांधण्यात यावा, तसेच या रस्त्याची मलमपट्टी न करता रुंदीकरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे यांच्यासह सोमनाथ बोत्रे, बाळासाहेब साने, माणिक तुळवे, गणेश आल्हाट आदींनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)