उंब्रज, दि. 23 (वार्ताहर) – खालकरवाडी, ता. कराड येथील डोंगराच्या पायथ्याशी डोंगर नावच्या शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकर्यास गुरुवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याप्रकरणी वनविभागाने योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खालकरवाडी, ता. कराड येथील शेतकरी एकनाथ इंगळे हे चाफळ रस्त्यालगत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर नावाच्या शिवारात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री गेले होते. यावेळी शेताच्या नजीकच्या रस्त्यावर बिबट्या बसल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी इंगळे यांच्यासह घटनास्थळी जावून पाहणी केली असता शिवारात बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आले. बिबट्याचे लोकवस्ती नजीक दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा