खऱ्या अर्थाने आता “पाणीवॉर’ सुरू

कालवा समिती राहीली पालिका, “जलसंपदा’मधील चर्चा, वादाचे “टेबल’

– अंजली खमितकर

पुणे – शहराला होणारा पाणीपुरवठा आणि त्याचे मोजमाप याची चर्चा कालवा समितीच्या बैठकीत केली जात होती. ही समिती म्हणजे महापालिका आणि जलसंपदा विभागामधील चर्चेसाठी, वादविवादासाठी महत्त्वाचे “टेबल’ होते. मात्र आता या समितीची कवचकुंडलच काढून घेतली असून, जलसंपदा विभागाच्या पुढे आता कोणालाच जाता येणार नाही, “अहं सर्वामि’ अशी स्थिती विभागाने निर्माण केली आहे.

लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे वर्षाला 16 टीएमसी पाणी द्या, अशी मागणी वारंवार महापालिकेने केली आहे. मात्र “लोकसंख्येच्या आधारे आता देतो आहोत, ते पाणी जास्तच आहे’ अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली होती, जी आजही कायम आहे.

कालवा समितीच्या बैठकीत आमदार, खासदार, मंत्री पाण्याविषयी मागण्या करत होते. मात्र आता हे सगळेच जलसंपदा विभागाने “स्कीप’च करून टाकले आहे. राज्य सरकारने यापुढे पिण्याच्या पाण्याचा कोटा निश्‍चित करताना कालवा सल्लागार समितीऐवजी “महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणा’च्या आदेशाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या “महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणा’चा आधार घेऊन महापालिका पाण्यासाठी भांडत होती, त्यांचाच आधार घेऊन, त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून ती चालवण्याचा घाटही जलसंपदाविभागाने घातला आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे कालवा समिती केवळ लुटुपुटूच्या चर्चेसाठीच आणि कागदावरच शिल्लक राहणार हे दुर्दैव आहे.

वर्चस्व धुडकावून लावले
एवढेच नव्हे तर कालवा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत पालकमंत्री, शहरातील आमदार, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांचा वट पाण्याबाबत होता. मात्र आता हे वर्चस्व देखील जलसंपदा विभागाने धुडकावून लावले असून, “आम्ही म्हणू तेच होणार तुम्हांला काहीच बोलता येणार नाही’ असेही आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सगळ्यांचे पाण्याविषयात बोलण्याचे अधिकारही त्यांनी पूर्णपणे काढून घेतले आहेत.

काटकसरीने पाणी वापरावे लागणार
या सगळ्याचा परिणाम आता पुण्याच्या पाण्यावर निश्‍चितच होणार असून, आता खऱ्या अर्थाने “पाणी वॉर’ सुरू होणार हे देखील स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येचे गणित आणि मिळणारे पाणी याची सांगड जलसंपदा विभाग कसा घालणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. याच लोकसंख्येच्या आधारे त्यांनी मिळणारा पाणीकोटा अधिक आहे, असे म्हटले होते. जर तसे नसते तर या आधीच पाणीकोटा वाढवून मिळाला असता. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे स्पष्टच होणार आहे. पाणी वाढवून मिळणार नाहीच, परंतु कमी मात्र निश्‍चित होणार आणि पुणेकरांना पाणी कपात होऊन काटकसरीने पाणी वापरावे लागणार हे देखील निश्‍चित झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)