खरे ड्रामेबाज कोण हे सातारकरांना माहित आहे

अमोल मोहिते यांची टीका
सातारा- बहुमत असल्यामुळे सातारा पालिकेचा कारभार नियोजनशुन्य आणि मनमानी पध्दतीने सुरु आहे. कुणाला किती कमिशन मिळाले, मला नाही मिळाले यावरुन पालिकेत एकमेकांचे गळे धरण्याची परंपरा सुरु झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून खड्डे भरले जात नाहीत म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चाने खड्डे भरले. यामागे लोकांची समस्या सोडवण्याचा उदात्त हेतू होता. याला तुम्ही स्टंटबाजी म्हणत असाल तर, डंपर आणि टीपर चालवून कोणते प्रश्‍न सुटले? त्यामुळे खरा स्टंटबाज आणि ड्रामेबाज कोण हे सातारकरांना कळुन चुकले आहे, असा प्रतिटोला नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी लगावला आहे.

रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून शहरात फिरावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांवरील खड्डे मुजवले जात नसल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने खड्डे भरण्याची मोहिम हाती घेतली. विषय पालिकेचा चालला असताना सत्ताधाऱ्यांनी नेहमीप्रमाणे संस्थांचा विषय काढुन मुद्दापासून पळ काढला. तुम्ही आमच्या संस्थांची काळजी करु नका त्यासाठी आमचे नेते समर्थ आहेत. आमच्या एकाही संस्थेत भ्रष्टाचार झालेला नाही आणि कोणाचाही एक रुपायाही बुडालेला नाही. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा खासदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी संस्थांच्या वार्षिक सभेला उपस्थित रहावे. सभासदच तुम्हाला उत्तर देतील, असे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. ज्या विश्‍वासाने पालिकेची सत्ता सातारकरांनी दिली, त्या सातारकरांचा विश्‍वास पायदळी तुडवू नका. पालिकेचा भ्रष्टाचारी कारभार लपवण्यासाठी मुद्दाला बगल देवू नका, हिम्मत असेल तर, पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराबाबत बोला, असे मोहिते यांनी म्हटले आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मोहिमेमुळे सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडतील आणि पालिकेचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, बांधकाम सभापती मनोज शेंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकावरुन अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. सातारकरांच्या समस्या सोडवण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांची राहिलेली नाही. शेंडे यांच्या म्हणण्यानुसार जर खड्डे भरले असतील तर आज रस्त्यांची दयनीय अवस्था दिसली असती का? कामे झाल्याचे सांगणाऱ्यांनी खड्डे भरण्याची नुसती बिले काढली का? केवळ डायलॉगबाजी आणि डंपर, टीपर सारखी वाहने चालवून सातारकांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे डायलॉगबाजी बंद करा आणि जनतेच्या समस्या सोडवा.

जिल्हाधिकाऱ्यांसमोरच नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांची हमरीतुमरी होते, यावरुनच पालिकेत काय सावळा गोंधळ सुरु आहे, हे उघड झाले आहे. लाखो रुपये खर्च करुन डंपर, टीपर आणले पण, कचराकुंड्या भरुनच वाहत आहेत. पालिकेचा कारभार रामभरोशे सुरु आहे हीच का तुमची लोकप्रियता? ज्या शेंडेंच्या नावे पत्रक काढले त्याच शेंडेंनी घेतलेल्या लाईट टेंडरमधील गौडबंगाल काय आहे? हेही शेंडे यांनी सातारकरांसमोर उघड करावे. आम्ही विरोधात असल्याने आमच्या नेत्यांनी निधी आणला तरी तुम्ही ठराव मंजूर करणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वखर्चातून खड्डे भरण्याची मोहिम हाती घेतली. आतातरी जागे व्हा आणि नौटंकी करण्यापेक्षा कामे करा, असा टोला मोहिते यांनी लगावला आहे.

मंगळवार तळ्यातील विसर्जन कोणी थांबवले?
आज गणेशमुर्ती विसर्जनाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुर्वीपासून मंगळवार तळ्यात मुर्ती विसर्जन व्हायचे. आज खासदार स्वत: मंगळवार तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास धरत आहे. मग, मंगळवार तळ्यात विसर्जन करण्याची परंपरा कोणी बंद केली? तळे आपच्या मालकी हक्‍काचे आहे, त्यात विसर्जन होणार नाही असा वटहुकुम कोणी जारी केला, हे खासदारांनी सांगावे, असेही मोहिते यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)