खरी श्रीमंती

एखादा शिक्षक 35-38 वर्षे अध्यापन करतो आणि सुखाने निवृत्त होतो. शिक्षकीपेशा पार पाडत असताना कधी त्याच्या वाट्याला मुख्याध्यापक पद येते, कधी येत नाही. मात्र या सेवाकालात तो स्थिरस्थावर झालेला असतो. मुलं शिकून रांगेला लागलेली असतात. या सेवानिवृत्त शिक्षकानेही एक टुमदार बंगली बांधलेली असते. सेवानिवृत्तीचे पेन्शन मिळत असते. गावची शेती सुधारलेली असते. त्यात विहीर पाडून, पाईपलाईन करून, ठिबक सिंचनाद्वारे हिरवीगार फुलवलेली असते. बॅंकेत प्रॉव्हिडंड फंडाची रक्‍कम व्याजी लावलेली असते. पण हे सारं सुख म्हणजे त्यांची श्रीमंती नसते; तर त्यांनी घडवलेले विद्यार्थी ही त्यांची श्रीमंती असते.

उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकवणाऱ्या आणि आता निवृत्त झालेल्या रमाकांत बनशेळकीकर या शिक्षकाची अशीच ही एक खरीखुरी गोष्ट! बनशेळकीकर नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांचा एक मुलगा धुळ्याला मेडिकलचा कोर्स करीत होता. म्हणून सर त्याला भेटायला गेले होते. दुपारचे जेवण करून मुलगा संदीप याच्याबरोबर ते रिक्षाने खोलीकडे निघाले होते. तर रस्त्यात एका मोठ्या बंगल्यावर एक नाव त्यांनी वाचले. “सुधा कानडे- जिल्हा सत्रन्यायाधीश, धुळे.’ पाटी वाचून रमाकांत सरांच्या मनात काहीतरी जुन्या स्मृती चाळवल्या. ते संदीपला आणि रिक्षाचालकाला म्हणाले,
“”अरे, रिक्षा थांबव. हे नाव मला ओळखीचं वाटतंय.” ड्रायव्हरने रिक्षा थांबवली. सरांनी त्याला पैसे देऊन वाटेला लावले. ते त्या बंगल्यासमोर थांबले. इकडे तिकडे पाहिले. आत जाऊ की नको असा विचार करू लागले. तर तेवढ्यात एक सशस्त्र पोलीस तेथे आला. मोठ्या आवाजात रागाने म्हणाला,
“”इथं बंगल्यासमोर का थांबलात? चला निघा.”
रमाकांत सर नावाच्या पाटीकडे बोट दाखवत म्हणाले, “”ही माझी विद्यार्थिनी आहे. मला तिला भेटायचंय.” “”तसं भेटता येणार नाही. त्या कामात आहेत.” “”बरं, मी आलोय एवढा निरोप तरी द्या. मी त्यांचा शिक्षक आहे. आहे म्हणजे पूर्वी होतो.”
“”तशी चिठ्ठी लिहून द्या. त्यांनी परवानगी दिली तर आत जाता येईल, नाही तर नाही.” रमाकांत सरांनी पेन काढला. संदीपने खिशातील एक छोटा कागद पुढे केला. सरांनी त्यावर नाव लिहिले. ओळख लिहिली. चिठ्ठी आत गेली. आणि लगेचच एक हसतमुख व्यक्‍ती बंगल्याबाहेर आली आणि उत्साहाने म्हणाली, “”सर, सर, असे आत या. किती दिवसांनी भेटलात?” रमाकांत सर आणि मुलगा संदीप आत गेले. सर पायातील चपला दरवाजापाशी काढू लागले. तर ती त्यांची एकेकाळची विद्यार्थिनी सुधा कानडे सरांना म्हणाली, “”सर, चपला काढू नका. तसेच आत या.” “”अगं, चपला बाहेर काढलेल्याच बऱ्या. आत कशाला? धुळीने माखल्यात त्या.”
“”असूद्या सर धुळीने माखलेल्याच असू द्या. तुम्ही तसेच आत या; चपलांसकट.”
“”रमाकांत बनशेळकीकर त्यांच्या चपलांसह आत गेले. संदीपने मात्र त्याच्या चपला बाहेरच काढल्या. रमाकांत सर आत जाताच सत्रन्यायाधीश सुधा कानडे यांनी रमाकांत सरांच्या पायावर डोके ठेवले. अत्यंत नम्रपणे त्यांना वंदन केले. एखादा भक्‍त, भक्‍तिभावाने परमेश्‍वरापुढे नतमस्तक होतो तसा! तेव्हा रमाकांत सर म्हणाले,
“”अगं मला चपला तरी काढू देत, मग माझ्या पाया पड.” तर सुधा कानडे म्हणाल्या, “”नाही सर. आज मला तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावायचीय. तुम्ही मला घडवलंत, वाढवलंत. म्हणून आजची सुधा कानडे इथपर्यंत आली. तुम्ही दिलेले संस्कार ही आमची शिदोरी आहे.” असं म्हणताना तिचे डोळे पाणावले होते. तिला गहिवरून आले होते. रमाकांत सरही गहिवरले होते. संदीप आपल्या वडिलांची श्रीमंती अनुभवत होता आणि मनात म्हणत होता- शिक्षकाच्या जीवनात याच्यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असू शकतो?

डॉ. दिलीप गरूड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)