सरासरीच्या 86 टक्के पाऊस : जलाशयांमध्ये 66 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साठा
मुंबई – राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 823 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के साठा निर्माण झाला असून खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

गेल्या वर्षी याच सुमारास 748.9 मि.मी. म्हणजेच 78.3 टक्के पाऊस झाला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 16 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्के, तर 7 जिल्ह्यांमध्ये 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140.69 लाख हेक्‍टर असून 31 ऑगस्ट 2018 अखेर 135.90 लाख हेक्‍टर क्षेत्रावर (97 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच ऊस पिकासह असणाऱ्या 149.74 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी 137.63लाख हेक्‍टर म्हणजेच 92 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात भात व नाचणी पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत.

राज्यातील जलाशयात 4 सप्टेंबर 2018 अखेर 66.1 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 64.95 टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात 93.07 टक्के (93.96) इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात 87.28 टक्के (85.34), नाशिक विभागात 63.21 टक्के (71.71), अमरावती विभागात 54.16 टक्के (26.37), नागपूर विभागात 48.51 टक्के (33.10) आणि मराठवाडा विभागात 29.21 टक्के (45.42) इतका साठा उपलब्ध आहे.

राज्यात 311 टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा
राज्यात 27 ऑगस्ट 2018 अखेर एकूण 311 टॅंकर्सद्वारे 309 गावे आणि 322 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 149 गावांना 158 टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील 18 गावे आणि 3 वाड्यांसाठी 24 टॅंकर्सचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 25 ऑगस्ट 2018 अखेर 30 हजार 410 कामे सुरु आहेत. या कामावर 1 लाख 40 हजार 521 इतके मजूर उपस्थित आहेत. तसेच शेल्फवरील 5 लाखापेक्षा जास्त कामे असून त्या कामांची मजूर क्षमता 12 कोटींहून अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)