खरीप पीक नुकसानभरपाई मिळेना

राहुरी- तालुक्‍यातील मागील वर्षातल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई पुढील खरीप आला तरी मिळालेली नाही. तालुक्‍यात पिकांचे 10 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

सततच्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, आदी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सरकारी यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. परंतु, नुकसानीची भरपाई अद्यापि शेतकऱ्यांना मिळाली नाही. पीकविम्याचे दावे अगोदरच विमा कंपनीने नाकारले. त्यात आता दुसऱ्या खरिपाच्या पेरणीचा हंगाम आला आहे. किमान हे नुकसानीचे अनुदान जरी मिळाले तरी थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातून बी-बियाणे खरेदीसाठीही हातभार लागणार आहे. शासनाने अनुदान वितरीत करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्‍यात मागील खरीप हंगामात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, मूग, आदी पिके घेतली.

पिकेही जोमदार आली होती. परंतु, ऐन काढणीच्या वेळेला पावसाने जोर धरल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे पीक विमे शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या आवाहनानुसार उधार-उसणवार करून भरले होते. परंतु, विमा कंपनीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्त आल्याने या दाव्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

तालुका या पिकविम्यापासून वंचित राहिला. सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातही 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्याच पिकांचे पंचनामे शासकीय पातळीवर करण्यात आले. त्याचे अनुदानही अद्यापि शेतकऱ्यांना मिळाले नाही. तालुक्‍यातील अतिवृष्टीने बाधित 40 गावांतील आणि सततच्या पावसाने 12 गावांतील नुकसानीचे पंचनामे करून पात्र ठरलेली गावे, कंसात क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) आणि अपेक्षित निधी पुढीलप्रमाणे ः सात्रळ (17.95 हेक्‍टर, 24 लाख 2 हजार 325 रुपये), माळेवाडी- डुक्रेवाडी (16.65 हेक्‍टर, 2 लाख 24 हजार 775), सोनगाव (12.20, 1 लाख 64 हजार 700), धानोरे (32.45, 4 लाख 38 हजार 75 रुपये), कोल्हार खुर्द (240.64, 32 लाख 74 हजार 155), रामपूर (86.40, 12 लाख 21 हजार 300), तांभेरे (37. 40, 3 लाख 44 हजार 100 रुपये), तांदूळनेर (22.70, 2 लाख 9 हजार 300), टाकळीमियॉं(113.40, 15 लाख 30 हजार 900), मुसळवाडी (47 हेक्‍टर, 6 लाख 34 हजार 500), मोरवाडी (32.55, 4 लाख 39 हजार 425), आरडगाव – (284.71, 38 लाख 43 हजार 555) , तांदूळवाडी (70.32, 9 लाख 49 हजार 320), खुडसरगाव (193.43, 26 लाख 11 हजार 305), पाथरे खुर्द- (332.11, 44 लाख 83 हजार 485), वांजूळपोई (131.34, 17 लाख 73 हजार 90 रुपये), तिळापूर (163.20, 22 लाख 32 हजार), कोपरे (101.67, 13 लाख 72 हजार 545), माहेगाव (85.04, 11 लाख 48 हजार 40), मालुंजे खुर्द (61.13, 8 लाख 25 हजार 255), महालगाव (28.16, 3 लाख 80 हजार 160), दरडगाव (27.90, 3 लाख 76 हजार 650), मांजरी (155.89, 21 लाख 4 हजार 515), शेनवडगाव (67.01, 9 लाख 46 हजार 35 रुपये), देवळाली प्रवरा (495.71, 67 लाख 29 हजार 120), चिंचोली (88.88, 11 लाख 99 हजार 880), गंगापूर (42.35, 5 लाख 71 हजार 725), पिंपळगाव फुणगी (91.56, 12 लाख 36 हजार 60), दवणगाव (63.55, 8 लाख 57 हजार 925), संक्रापूर (52.60, 7 लाख 10 हजार 100), चांदेगाव (25 हेक्‍टर, 3 लाख 37 हजार 500), बोधेगाव (16.90 हेक्‍टर, 2 लाख 29 हजार 50), करजगाव (23.90, 3 लाख 22 हजार 650), ब्राम्हणगाव भांड (42.40, 5 लाख 75 हजार 100), लाख (135.47, 18 लाख 35 हजार 145), जातप (163.56, 22 लाख 10 हजार 760), त्रिंबकपूर (79.25, 10 लाख 78 हजार 875), आंबी (98.78, 13 लाख 35 हजार 330), अंमळनेर (97.84, 13 लाख 20 हजार 840), केसापूर (114.73, 15 लाख 59 हजार 655).
सततच्या पावसाने बाधित केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, मानोरी, कोंढवड, शिलेगाव, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, चेडगाव, उंबरे, वळण, चंडकापूर, पिंप्री वळण अशा एकूण 52 गावांतील 7 हजार 485 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा जवळपास 10 कोटींचा निधी शेतकऱ्यांना मिळाला तरी पेरणीसाठी त्याचा फायदा होणार आहे. शासनाने देऊ केलेले 10 हजार रुपयांचे तातडीचे कर्ज मिळण्यास 10 टक्के शेतकरी पात्र होणार नसल्याने किमान अनुदान मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांचेपुत्र, भूमिपुत्रांचेकैवारी म्हणवणारे तालुक्‍याचेप्रतिनिधी प्राप्त परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे करवून घेतात. त्यांचं प्रेम मात्र पुतणामावशीचंआहे. पेरणी जवळ आली आहे.तातडीच्या 10 हजारांच्या कर्जाला जाचक अटी घातल्यानेशेतकरी नाराज आहेत. त्यांना प्रत्यक्ष कृती दाखवायची असेल तर मागील वर्षाच्या पंचनाम्याचेआणि शेतकऱ्यांच्या हक्काचे 10 कोटी रुपये तातडीनेउपलब्ध करावे.
– शिवाजी गाडे, जिल्हा परिषद सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)