खरा स्वाभिमान

रावसाहेब इनामदार हे तालुक्‍यातील बडं प्रस्थ होतं. ते स्वतः आमदार होते. मुलगा विजय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. तालुक्‍यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना रावसाहेबांच्या ताब्यात होता. शिवाय तालुक्‍यात त्यांनी वडिलांच्या नावाने “दादासाहेब इनामदार कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय’ सुरू केलं होतं. या महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजपासून सिनिअर कॉलेजपर्यंत पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. रावसाहेबांचा राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठा वावर होता. त्यांच्या शब्दाला मान होता.

इनामदार कॉलेजचे प्राचार्य राम प्रधान यांनी महाविद्यालय उत्तम चालवलं होतं. कॉलेजची गुणवत्ता वाढविण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत होते. त्यासाठी त्याण्बी अनेक नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवले. एकांकिका स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वार्षिक निकाल, कॉलेजचे नियतकालिक या सर्वच आघाड्यांवर विद्यार्थी चमकत होते. साऱ्या जिल्ह्यात कॉलेजचं नाव झळकत होतं. प्रधान सरांचं अद्यापन, प्रशासन, शिस्त, गुणवत्ता या सर्वच बाबतीत ते आघाडीवर होते. गेली सहा वर्षे त्यांनी कॉलेजला उत्तम मानांकन मिळवून दिलं.

प्रधान सर आता साठीला आले होते. चार महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. रावसाहेबांनी प्रधान सरांचं काम जवळून पाहिलं होतं. हा माणूस आपल्या उपयोगाचा आहे हे त्यांनी हेरलं होतं. म्हणूनच एकेदिवशी सायंकाळी रावसाहेबांनी त्यांना बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. वेळ पाळणारे प्रधान सर वेळेवर उपस्थित राहिले. रावसाहेबांनी गडगडाटी हसून सरांचं स्वागत केलं. त्यांना बसायला सांगितलं. चहापाणी झाल्यावर रावसाहेबांनी विषयाला हात घातला. ते म्हणाले,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सर, आता चार महिन्यांनी तुम्ही रिटायर होणार, तर आता पुढं काय करायचं ठरवलंय? म्हणजे तुमच्या डोक्‍यात काय आयडिया असलंच की. नाहीतर आमची आयडिया पटती का बघा.”
“तुमची कोणती आयडिया आहे?”
“त्याचं काय आहे प्रधान सर, आमचा कारभार पडला मोठा आम्हाला माणसं कमी पडत्यात. त्यात तुमचं इंग्रजीबी चांगलं हाय. अलीकडं बराच कारभार इंग्रजीत चालतोय. तवा पत्रव्यवहारासाठी, भाषण लिहून देण्यासाठी, कॉलेजकडं लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला चांगला माणूस पाहिजे. तव्हा आमच्या डोक्‍यात तुमचं नाव आलं.”
“म्हणजे मी तुमचा पी.ए. व्हावं. असं म्हणायचंय का तुम्हाला?”

“व्हय व्हय, तेच म्हणायचंय. तुम्ही आमचं खासगी मदतनीस व्हावं असं आम्हाला वाटतं.”
“यात माझं अवमूल्यन होत आहे असं वाटत नाही तुम्हाला?”
“”मूल्य म्हणजे पैशाचं म्हणताय व्हय? अहो, मास्तरकीत तुम्हाला जे मिळतंय त्याच्या दुप्पट देऊ की. पैशाची कशाला काळजी करताय? फक्त सभेमधी आमच्या कामाचं तेवढं कौतुक करायचं.”
“अहो मूल्य आणि किंमत यात फरक आहे. मी मूल्याधिष्ठित जीवनाची गोष्ट बोलतोय, आणि तुम्ही माझी पैशात किंमत करताय.”

“हे कोड्यात बोलणं आम्हाला नाय समजलं. जरा सोपं करून सांगा.”
“मी अगोदरच माझ्या पुढील आयुष्याचं नियोजन केलंय. आतापर्यंत मी कॉलेजच्या मुलांच्या भवितव्यासाठी काम केलं. आता मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी वेळ द्यायचाय. वाचन, लेखन, पर्यटन, नातवंडांबरोबर खेळणं या गोष्टींसाठी मला वेळ द्यायचाय. आता पैशांसाठी कुठलीही बांधिलकी पत्करायची नाही मला.”
“म्हणजे तुमचं पुढचं सारं ठरलंय तर?”
“होय. सारं नियोजन झालंय. आणि फुलं वेचली, तिथं गोवऱ्या वेचायच्या नाहीत मला. त्यामुळं तुमची आयडिया मी स्वीकारू शकत नाही. राग येऊन देऊ नका. पण मला समजून घ्या.”

प्रधान सरांच्या बोलण्यावर रावसाहेब काही बोलू शकले नाहीत. ते निरुत्तर झाले. मग प्रधान सर नमस्कार करून बंगल्यातून बाहेर पडले. आता त्यांना मोकळे मोकळे वाटत होते. मनावरचे दडपण कमी झाले होते. त्यांनी खिशातील रुमाल काढून कपाळावरचा घाम टिपला. आता त्यांची पावलं आत्मविश्‍वासाने घराकडे पडत होती आणि मन म्हणत होतं, “”कुणीतरी पैशाच्या जोरावर आपणाला खासगी नोकर म्हणून ठेवू पाहातोय, ही गोष्टच चीड आणणारी आहे. माणसं वापरायची आणि फेकून द्यायची ही यांची संस्कृती! ही सत्तेची आणि पैशाची मुजोरी धुडकावणं यातच खरा स्वाभिमान आहे. आणि मी तेच केलं.”

डॉ. दिलीप गरुड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)