खराळवाडीतील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खराळवाडी परिसरामध्ये मागील पाच ते सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यातही अशी परिस्थिती उद्‌भवल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली आहे. महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खराळवाडी परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे. त्यामुळे पिण्यापुरते पाणी ही उपलब्ध होत नाही आहे. पाण्याअभावी महिला वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेली अनेक महिने या भागात अपुऱ्या पाणीपुरवठ्‌याची समस्या आहे. परंतु, पाणी नियमित येत असल्याने एखाद दिवशी पाणी कमी आले तरी सर्व कामे सुरळीत पार पडायची. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणीच येत नसल्याने नागरिक जवळच्या परिसरात असलेली पाण्याची ठिकाणे शोधून तिथून पाणी आणत आहेत. लांबून पाणी आणावे लागत असल्याने घरातील एकाला कामे सोडून पाण्यासाठी फिरावे लागते आहे. एच. ए. वसाहत परिसरात असलेल्या हातपंपावरून रात्री-अपरात्री नागरिक पाणी आणत आहेत. त्याचबरोबर परिसरात असलेल्या मंदिरातून देखील नागरिक पिण्यासाठी पाणी आणत आहे. महापालिकेकडे नियमित कर भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाणी येण्याची वेळ सकाळी तीन-चारच्या दरम्यान असल्याने घरातील एकाला पाणी भरण्यासाठी जागेच रहावे लागत आहे. ही परिस्थिती मागील काही वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. झोपमोड करुनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. पाण्याअभावी महिलांच्या दैनंदिन कामकाजाचा खोळंबा होत आहे. बऱ्याचदा सकाळऐवजी संध्याकाळी अथवा रात्री दहा वाजता नळाला पाणी येते. याची कोणतीही कल्पना नसल्याने नागरिकांची पाणी भरण्यासाठी तारांबळ उडते. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्यांना पाणीच मिळत नाही. पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर येते. श्रावण महिना लागताच सणवार सुरु होतात. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा प्रश्‍न वेळीच सोडवावा, अशी मागणी खराळवाडीवासियांकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)