खड्‌डे मुक्‍तीसाठी मनसेचे आंदोलन

पिंपरी – पावसाला सुरुवात होताच पिंपरी- चिंचवड शहरातील रस्त्यावर खड्‌डे पडले आहेत. शहराच्या विविध भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहर खड्‌डेमुक्त करण्यासाठी मनसेने दुपारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आयुक्त हर्डीकर कामानिमित्त नागपूरला गेल्याने, प्रशासनाच्या वतीने शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.

मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. स्थापत्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची डागडुजी होणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेकडून कोणत्याही प्रकरणाचे काम न झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्याचा परिणाम म्हणजे शहरात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत. रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकीवरील एका तरुणीचा अपघात होऊन, तिला प्राण गमवावे लागले. ही बाब गांभिर्याने घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला.

नागरिकांनी कर ही भरायचा आणि स्वत:चा जीवही द्यायचा, ही कोणती पध्दत आहे? असा सवाल करत येत्या दहा दिवसांत शहरातील खड्‌डे बुजविण्यात यावेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.

दरम्यान, ही बाब समजताच महापौर नितीन काळजे यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना आपल्या दालनात बोलावून, त्यांच्याकडून शहरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची व खड्‌डे बुजविण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणेची माहिती जाणून घेतली. हे खड्‌डे तत्काळ बुजविण्याच्या सूचना त्यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)