खड्डे…धूळ आणि वाहतूककोंडी!

नऱ्हे-धायरी गावांतील रस्त्यांची दुरवस्था


विद्यार्थी, चाकरमान्यांना रोजचाच मनस्ताप


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिनिधींना मात्र विकासकामांचा विसर

पुणे – रस्त्यावर मोठे खड्डे, अरुंद रस्ता आणि ये-जा करणाऱ्या डंपरमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे नऱ्हे, धायरीतील नागरिक त्रस्त झाले असून ही परिस्थिती सुधारण्याबाबत प्रशासन अपयशी ठरले आहे. दोन्ही गावांच्या सीमेचा रस्ता अशी या मार्गाची ओळख असून वर्षानुवर्षे याच स्थितीत हा रस्ता आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत असून गर्दीच्या वेळेत तासन्‌तास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत आहे.

नऱ्हे आणि धायरी या दोन गावांची हद्द जेथे संपते, तेथे हा रस्ता आहे. याला “डांबर प्लांट रस्ता’ अशीही ओळख आहे. मात्र, हद्दीच्या वादामुळे रहदारीसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. नऱ्हे येथील पारी कंपनीपासून पुढे श्रीयश कंट्रोल चौकापर्यंत सिमेंट रस्ता झाला आहे. मात्र, येथून पुढे पुन्हा हद्दीचा वाद आहे. याच रस्त्यांवर पुढे लायगुडे वस्ती, साईधाम सोसायटी, नालंदा हायस्कूल, अभिवन कॉलेज, धारेश्‍वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. यामुळे रस्त्याचा वापर मोठा आहे. मात्र, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, चाकरमान्यांना पोहचण्यास उशीर होतो. पुढे खडी प्लांट असल्याने डंपरची वर्दळ मोठी आहे. अगदी दहा-दहा मिनिटांनी येथून डंपर ये-जा करतो. यामुळे अरुंद असलेल्या या रस्त्यावर कोंडी होऊन तासन्‌तास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागते. धुळीचे प्रमाण जास्त असल्याने तोंड झाकून जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिक सांगतात. अशी परिस्थिती असतानाही येथील लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

घसरुन पडणाऱ्यांची संख्याही मोठी
वर्षानुवर्षे रस्त्याचे काम न झाल्याने खड्डेच खड्डे पडले आहेत. यातच पाण्याचे टॅंकर जात असल्याने दिवसभर रस्ता ओलाच असतो. अशात श्री कंट्रोल चौकातून पुढे चढाचा रस्ता आणि खड्डे यामुळे रोज किमान दोन ते तीन जण गाडीवरुन घसरुन पडत असल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले. लोकवस्ती वाढल्याने येथे रहदारीचे प्रमाण वाढले आहे.

रहिवासी, दुकानदारांना श्‍वसनाचा त्रास
पूर्णपणे कच्च्या रस्त्याचे स्वरुप आलेल्या या रस्त्यावर धूळ आणि माती भरुन येणारे डंपर यामुळे रस्तालगत राहणारे नागरिक आणि विशेषतः दुकानदार यांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे दुकानदार सांगतात. यामुळे दिवसभर तोंडाला रुमाल लावूनच दुकानावर बसावे लागत असल्याची कैफियत काही दुकानदारांनी दै. “प्रभात’कडे मांडली.

लोकप्रतिनिधी निवडणुकीपुरतेच
निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी रस्ता दुरुस्तीच्या कामाचे आश्‍वासन दिले जाते. मात्र, एकदा निवडून आल्यानंतर नेतेमंडळी पुन्हा वर्षानुवर्षे रस्त्याकडे साधे फिरकतही नाहीत. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर येथील लोकप्रतिनिधींना नागरिकांची आठवण येत असून तेवढ्यापुरतेच रस्ता बांधणीचे आश्‍वासन दिले जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)