खड्डेमुकतीचे सातारी राजकारण

संदीप राक्षे

सातारा- साताऱ्यातील खड्डयाच्या मुद्‌द्‌यावरून राजघराण्यातील राजेशाही भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकमेकांशी राजकीय स्पर्धा तीव्र करत टोकाच्या राजकारणाची प्रचिती दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका कशा जातील, एवढाच तर्क सध्या प्रचंड राजकीय हेलकावे घेतो आहे.

मनोमिलनातून एकत्र राहोत किंवा स्वतंत्र; राजकीयदृष्ट्‌या दोन्ही नेत्यांची राजकीय सोय साताकरांसाठी अजिबात फायद्याची ठरलेली नाही. तरी पण साताऱ्याच्या राजकारणाला राजेशाही परिघ अद्याप ओलांडता आलेला नाही. काय सोयीचे-गैरसोयीचे आहे, यात सातारकरांना रस नाही. सातारा विकास आघाडीची टक्केवारी विरुद्ध नगर विकास आघाडीची मोर्चेबांधणी असाच राजकीय सामना सातत्याने रंगत आहे. खड्डे भरण्याच्या शिवेंद्रसिंहराजे यांच्या गांधीगिरीने सातारा पालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली. तरी पण पालिकेच्या बांधकाम विभागाचे मुजोर पाटील पुण्या-मुंबईचा कधी प्रवास केला का असा खोडील प्रश्न विचारतात. प्रशासनाची ही असंवेदनशीलता सामान्य सातारकरांच्या डोकेदुखीचा विषय ठरली आहे.

नगरपालिकेतील कारभारावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांतून दोन्ही नेत्यांत पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. या वादातून भाऊबंदकीने तोंड बाहेर काढले आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात त्य भाऊबंदकीचा उभा दावा मांडला गेला आहे. ही राजेशाही टक्कर राष्ट्रवादीचे साताऱ्यातील भविष्य ठरवणार आहे. त्याची झलक शहरातील खड्डे भरण्याच्या निमित्ताने दिसून आली आहे. आगामी निवडणूक कोणाला कशी जाणार, यावर दोन्ही नेत्यांत वाद रंगला आहे. पत्रकबाजी कुरघोड्या यामध्ये साताऱ्याचा विकास मागे पडल्याची तक्रार आहे. या वादामुळे येणाऱ्या सातारा लोकसभा व सातारा-जावळी विधानसभा निवडणुकीतील चित्र कसे असेल, याचा अंदाज लोक बांधू लागले आहेत.

सातारा पालिकेच्या 2006 मधील निवडणुकीने मनोमिलन घडवून आणले. 2016 पर्यंत मनोमिलनाच्या दोन टर्म सातारकरांनी पाहिल्या आहेत. त्यापूर्वी आणि त्यानंतरच्या बिगर मनोमिलनाचा काळही जनतेने अनुभवला मात्र पदरात काहीच पडले नाही. अनुभवत आहेत. विकासाच्या पातळीवर सातारा पुढे सरकेनाच, ही सातारकरांची खरी खंत आहे. मनोमिलनाच्या दशकात नामकरणांच्या सोहळ्यांची अहमिका जनतेने पाहिली. 2011 मधील बिनविरोध निवडणूक कशी झाली, याचा अंदाज सातारकरांना उमेदवारी अर्जाची पळवापळवी पाहूनच आला. जिल्हाधिकाऱ्यांपुढील नगरसेवक अपात्रतेची सर्वाधिक प्रकरणे याच दशकातील आहेत. अजूनही पालिकेत समाजसेवकांचे भुंगे सोडून अजून कोणं अपात्रतेच्या कचाट्यात सापडतयं का ? याची चाचपणी होत असते. अशा अनागोंदीशिवाय इतर विकासकामेही झाली. मोजक्‍या मोठ्या प्रकल्पांशिवाय रस्ते, गटारे, पेव्हर, गार्डन बेंच, समाजमंदिरे, विद्युतीकरण अशा कामांचाच भरणा त्यात जास्त होता.

साताऱ्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने फारसे प्रयत्न होताना दिसले नाहीत. नगराध्यक्ष माधवी कदम यांचा गेल्या दीड वर्षात त्यांच्या अधिकारात एक स्वतंत्र प्रकल्प शहरासाठी नाही. सत्ता केंद्र रजताद्री व्हाया जलमंदिर असे ऑपरेट होत असल्याने नगराध्यक्ष राजकीय दृष्टया किती स्वायत्त आहेत याचे दर्शन सातारकरांना घडत आहेत.

दोन सत्तास्थाने एकत्र असताना साताऱ्याचा शाश्वत विकास साधण्यासाठीची निखळ अहमिका कुठेच दृष्टीस पडली नाही. मनोमिलनाच्या काळात मंजूर व सुरू झालेले झोपडपट्टीवासीयांना घरकुले, सुधारित पाणी वितरण व्यवस्था, कास उंची वाढ या योजना अद्याप अर्धवट आहेत. भुयारी गटार योजना अजून लांबच आहेत. हद्दवाढीचा निर्णय लटकल्याने नागरिकांशी संबंधित प्रश्नांचा गुंता वाढतोय.

औद्योगिक वसाहतीमध्ये तथाकथित कार्यकर्त्यांच्या टोळ्यांचे खंडणीराज सुरू आहे. लघुउद्योगांना संजीवनी ठरलेली ऍरिस्टोक्रॅट’ बघता-बघता निघून गेली. महाराष्ट्र स्कूटर’चं घोंगडं वर्षानुवर्षे भिजत पडलं आहे. कोणी काही करू शकले नाही. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका येतील. वरिष्ठ मंडळी हस्तक्षेप करतील. पक्षीय राजकारणात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी सर्वांना करावीच लागेल. तरीही सातारकरांचा प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो साताऱ्याचा शाश्वत विकास कधी होणार. तर उत्तर सध्या नाही आमच्या नेत्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची आहे ही राजकीय खसखसं ऐकायला मिळते .

सातारा जिल्ह्यात अनेक गावच्या गावं आहेत. ज्या गावांतील घरटी माणूस सैन्यात आहे. या जिल्ह्याच्या शहरात आज घरटी माणूस पुण्यात आहे. शिक्षण, नोकरी-धंद्यासाठी तो पाठीवर सॅग बांधून सोमवार ते शुक्रवार सातारा-पुणे असे अप-डाउन करतोय आणि येता-जाता तोच सर्वाधिक टोल भरतोय. पेन्शनरांचं गाव’ ही साताऱ्याची ओळख नव्हे, तर सल’ ठरली आहे. हे चित्र बदलण्यासाठी सातारा बदलायला हवा. सातारकरांचे हित त्यातच सामावले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)