खडसेंना “क्‍लीनचिट’ देण्यासाठीच लाचलुचपत खात्याचा अहवाल

भोसरी जमील खरेदीप्रकरणी हेमंत गवंडे यांचा गंभीर आरोप

पुणे – माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात मुक्त करण्यासाठीच लाचलुचपत खात्याने त्यांच्याबाजूचा अहवाल तयार केला असल्याचा गंभीर आरोप या मूळ प्रकरणातील फिर्यादी हेमंत गवंडे यांनी केला आहे. गुरूवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ जमीनमालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे 31 कोटी 11 लाख रुपये असताना, ती 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. रेडिरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून, भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते.

याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना “क्‍लीन चिट’ दिली होती. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत खात्याने न्यायालयात सादर केला होता. भोसरी येथील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे अर्थातच खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी गवंडे यांच्या आरोपामुळे या विषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे.

गवंडे यांनी लाचलुचपत खात्याच्या अहवालावरच अनेक प्रश्‍न उपस्थित केले. हा भूखंड चांगल्या किंमतीत विकला जाणार नाही, असे एमआयडीसीचे म्हणणे असेल, तर तो खडसे कुटुंबीयांनी कशासाठी घेतला? याकडे लाचलुचपत खात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे गवंडे यांनी आरोपात नमूद केले. सदर जमीन मूळ मालकांना मिळावी म्हणून खडसे यांनी बैठका घेतल्या असतानाच तीच जमीन स्वतःच्या कुटुंबीयांकरिता घेणे म्हणजे निव्वळ मोबदला मिळवण्याचा हेतू असल्याचाही आरोप गवंडे यांनी केला आहे.

लाचलुचपत खात्याच्या अहवालात आणि निष्कर्षात जमीन खरेदीचा हेतू, त्यासाठीची खडसेंची पूर्वतयारी, पदाचा केलेला गैरवापर या आणि अशा अनेक गोष्टींकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणातून खडसेंना मुक्त करणे इतकाच हेतून ठेवत अहवाल तयार केला आहे, असाही गवंडे यांचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)