खडतर परिश्रमातूनच यशाचा मार्ग : सेरेना विल्यम्स

सेरेना विल्यम्सने सांगितले यशस्वितेचे गुपित

लास व्हेगास: टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत तब्बल 23 ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकताना अतुलनीय कामगिरी केली आहे. परंतु या कालावधीत तिला अनेकदा अपयशातून मार्ग काढावा लागला आहे, तसेच निराशाजनक कामगिरीनंतर झुंजार पुनरागमन करावे लागले आहे. आजचे स्थान मिळविण्यासाठी असंख्य वेळा “कम बॅक’ करणाऱ्या सेरेनाने खडतर परिश्रम हेच यामागील रहस्य असल्याचे म्हटले आहे.

प्रशिक्षक, फिजिओ, डाएटिशियन, तसेच अन्य सपोर्ट स्टाफची बहुमोल मदत यामुळेच मी आज येथे पोहोचू शकले आहे, असे सांगून सेरेना म्हणाली की, त्यातच खेळात सुधारणा करण्यासाठी मी अफाट मेहनत केली आहे. प्रचंड स्पर्धा असलेल्या फॅशन डिझायनिंगच्या व्यवसायात यश मिळविण्यासाठी मला त्यापेक्षाही अधिक कष्ट घ्यावे लागतात आणि अखेरीस आजच्या घटकेला एक आई म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी इतके अफाट परिश्रम घेते आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही.

येथे सुरू झालेल्या “नॅशनल रीटेल ट्रेड शो’च्या उद्‌घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध व्यावसायिकांसमोर सेरेना बोलत होती. मला टेनिसप्रमाणेच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर असणे आवडते. त्यामुळे माझा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय भरभराटीला आणण्याकरिता काय करावे लागेल, याबाबत तुम्हीच मला सल्ला द्या, असे आवाहनही तिने आपल्या व्यवसायबांधवांना केले. मात्र गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीदरम्यान झालेल्या वादग्रस्त आणि नाट्यमय प्रसंगांबद्दल सेरेनाने काहीही बोलपणे टाळले.

जपानच्या नाओमी ओसाकाविरुद्धच्या अंतिम लढतीत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सेरेनाला पंचांनी तीन वेळा शिक्षा केली. पहिल्यांदा पंचांशी वाद घालण्याबद्दल, मग रॅकेट तोडल्याबद्दल आणि अखेरीस पंचांवर “चोर’ किंवा “खोटारडे’ असे आरोप केल्याबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले. पंच कार्लोस रॅमोस यांनी पहिल्यांदा सेरेनाला तंबी दिली, दुसऱ्या वेळी एका गुणाचा दंड केला व तिसऱ्या वेळी तब्बल एका गेमचा दंड केला, त्यामुळे सेरेनाला विजेतेपदाचीच किंमत मोजावी लागली.

या वेळी सेरेनासह रंगमंचावर उपस्थित असलेल्या फ्लायव्हील स्पोर्टसच्या कार्यकारी प्रमुख आणि अमेरिकेतील फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील एक बडे नाव असलेल्या साराह रॉब ओ’हेगन यांनी सेरेनाच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल, तसेच तिने दाखविलेली झुंजार वृत्ती व संयम याबद्दल सेरेनाची प्रशंसा केली. सेरेनाने या प्रसंगावर मात करून तिची हुर्यो उडविणाऱ्या प्रेक्षकांना शांत करणारा पुन्हा एकदा ओसाकाच्या विक्रमी विजेतेपदाकडे सर्वांचे लक्ष वळविले.
सेरेनाचे असामान्य धैर्य

आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सेरेनाने अनेकदा चमत्कार वाटावा इतक्‍या वेळा पुनरागमन केले आहे, असे सांगून साराह म्हणाल्या की, तुमचा ज्या गोष्टीवर विश्‍वास असतो, त्यासाठी झगडण्याकरिता असामान्य धैर्य आणि आत्मविश्‍वासाची गरज असते. सेरेनाने ही गष्ट साध्य केली आहे आणि तसे करताना आपली प्रतिष्ठा आणि महान व्यक्‍तिमत्त्वाला कोठेही तडा जाऊ दिला नाही. सेरेनाला ही गोष्ट साध्य करता आली नसती, तर तिला मिळविलेले सारे काही गमवावे लागले असते. परंतु तिने आपल्या जीवनातील आव्हानांना कमालीच्या धैर्याने तोंड दिले आणि नेत्रदीपक यशही मिळविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)