खडकवासला, टेमघर धरणातून वीजनिर्मिती

येत्या डिसेंबरपासून सुरू होणार प्रकल्प

  • गणेश आंग्रे

पुणे – टेमघर आणि खडकवासला धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. टेमघर धरणातून 4 मेगावॅट तर खडकवासला धरणातून 1.2 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार असून येत्या डिसेंबरपासून प्रत्यक्ष वीजनिमिर्तीला सुरूवात होणार आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प 2006 साली मंजूर करण्यात आला.

त्यानुसार या प्रकल्पात सहाशे किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे 1.2 मेगावॉट वीजनिमिती करण्यात येणार आहे. हे वीजनिर्मितीचे बीओटी तत्वावर एका कंपनीला देण्यात आले. या कंपनीने डिसेंबर 2016 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतू कालवा बंद करून खोदाईचे काम करण्यास कंपनीला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम रखडले होते. खडकवासला धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यावर त्याच्या मुखाशीच पॉवर हाऊस बांधून जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. वीजनिर्मितीनंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडण्यात येणार आहे. कालव्याच्या मुखाशी पाया खोदण्याचे काम कालव्यातील पाण्यामुळे करता आले नाही. मात्र मागील एक वर्षांपासून प्रकल्प उभारण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. आता युध्दपातळीवर जलविद्युत निर्मिती केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबरपासून प्रत्यक्ष वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती

पानशेत आणि वरसगाव धरणांच्या उभारणीनंतर या ठिकाणी पॉवर हाऊस बांधण्यात आले. या दोन्ही धरणातून खडकवासला धरणात सांडव्यातून पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर टेमघर आणि खडकवासला धरणातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. साधारणपणे खडकवासला धरणातून कालवा 170 दिवस सुरू असतो. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती केली जाणार आहे. टेमघर धरणाच्या पायथ्याशी वीजनिर्मिती केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याठिकाणी 1 मेगावॅटचे चार संच उभारण्यात येणार असून एकूण चार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)