खडकवासला कालव्यात चक्क “भिंत’ उगवली!

भिंत कोणी बांधली, याची माहितीच नाही


महापालिका-पाटबंधारे विभाग गोंधळात

पुणे – भिंतीला कान असतात…भिंत चालते हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. पण, चक्क एखादी भिंत कालव्यात अचानक उगवते हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. “पुणे तिथे काय उणे’ या उक्‍तीप्रमाणे महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागातील वादामुळे खडकवालसा कालव्यात ही भिंत उगवली आहे.

खडकवासला कालव्याला जनता वसाहतीजवळ दि.27 सप्टेंबर रोजी भगदाड पडले. त्यामुळे दांडेकर पूल परिसरात पाणीचपाणी झाले. या घटनेनंतर कालवा फुटलेल्या ठिकाणी नवीन भिंतही बांधण्यात आली. मात्र, ती कोणी बांधली याची लेखी माहिती महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही भिंत जर या दोन्ही विभागांनी बांधली नसेल, तर मग ती बांधली कोणी? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

काय आहे उगवलेल्या भिंतीचा गोंधळ?
कालवा फुटीनंतर महापालिका आणि पाटबंधारे विभागाने तातडीने त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. कालवा दुरूस्त न झाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने दोन्ही प्रशासकीय अधिकारी तेथे तळ ठोकून होते. या प्रकरणाला दीड महिना झाल्यानंतर आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनात या कालवा फुटीप्रकरणी काही तारांकित प्रश्‍न आले आहेत. त्याची उत्तरे देण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून या प्रश्‍नांची उत्तरे राज्यशासनाला पाठविली जात आहेत. यामध्येच एका प्रश्‍नात कालवा फुटल्यानंतर दुरूस्तीच्या कामाबाबत माहिती विचारण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर भिंत कोणी बांधली, त्याचा खर्च किती आला, हे काम कसे करण्यात आले याची माहिती पाटबंधारे विभागाने पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मागितली. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट हात वर करत ही भिंत आपण बांधली नसल्याचे सांगितले. तर, बांधकामाशी संबंधित काही विभागांनी आपण मजूर दिले, आपण वाहने दिली, आपण खडी दिली असे त्रोटक उत्तर देत भिंत नेमकी कोणत्या विभागाने बांधली, याची काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे आता या तारांकित प्रश्‍नाला नेमके काय उत्तर द्यायचे, यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागालाही पडला आहे.

अधिकाऱ्यांचाही दुजोरा
संबंधित प्रकाराबाबत महापालिकेच्या काही विभाग प्रमुखांकडे विचारणा केली असता, त्यांनीही या माहितीस दुजोरा दिला. हे काम नेमक्‍या कोणत्या विभागाने केले हे सांगणे कठीण असल्याचे सांगत, ही माहिती महापालिकेकडे नसल्याचे पाटबंधारे विभागास कळविण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे ही भिंत जर या दोन्ही यंत्रणांनी बांधली नसेल तर आली कोठून, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)