खडकवासला कालव्यातून अखेर पाणी सोडले

संग्रहित छायाचित्र

तात्पुरती दुरूस्ती : लष्कर जलकेंद्रही सुरू होणार

पुणे – मुठा उजवा कालवा फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. अखेर कालव्याची तात्पुरती दुरूस्ती झाल्याने पर्वती जलकेंद्रातून खडकवासला कालव्यात रविवारी संध्याकाळी 50 क्‍यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडल्यास कालव्याच्या नवीन बांधकामावर ताण येण्याची शक्‍यता असल्याने हे पाणी पर्वती जलकेंद्रातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 4 दिवसानंतर लष्कर जलकेंद्र सुरू होणार असून सोमवारपासून पूर्व भागातील पुणेकरांना कमी दाबाने का होईना, पण पाणी मिळणार आहे.

शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लष्कर केंद्राचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने शहराच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यावर सलग दुसऱ्या दिवशी परिणाम झाला. गुरुवारी महापालिकेचे पाणी बंद असल्याने तर, शुक्रवारी जलकेंद्र बंद असल्याने या भागातील नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागले.

दरम्यान, कालव्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून आवश्‍यक डागडुजी झाल्याने (शनिवारी) दुपारी दीडच्या सुमारास कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, कालव्यात साचलेल्या कचऱ्यामुळे या पाण्याला फुगटवा येऊन नव्याने बांधण्यात आलेल्या भिंतीवरून पाणी येऊ लागले होते. त्यामुळे प्रशासनाने आधी सहा फूट बांधलेली भिंत सकाळपर्यंत आणखी तीन फुटांनी वाढविण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता 50 क्‍युसेक पाणी कालव्यात सोडण्यात आले आहे. हे पाणी लष्कर जलकेंद्राजवळ अडवून ते शुध्दीकरण केंद्रासाठी घेतले जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

चार दिवसानंतर संपणार पाण्यासाठीचे हाल
कॅनॉलमधील पाणीपुरवठा तातडीने बंद केल्याने त्याच्या परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर शुक्रवारी झाला. प्रामुख्याने पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, गोखलेनगर, पुणे स्टेशन परिसर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क परिसर, नगररस्त्यावरील खराडी तसेच वडगाव शेरी परिसराला पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना गुरूवारपासून पाणी मिळालेले नाही. अनेकांना विकतच्या पाण्याच्या आधार घ्यावा लागला आहे. दरम्यान, कालव्याची नवीन भिंत पूर्ण सुरक्षित होईपर्यंत लष्कर जलकेंद्रासाठी पर्वती जलकेंद्रातूनच पाणी सोडणार असल्याचे महापालिकेने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)