खंडाळा घाटात ट्रक अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

  • दोघे गंभीर जखमी : मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक डोंगरावर आदळून उलटला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. खंडाळा (बोरघाट) घाटातील अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावरील वळणावर मंगळवारी (दि. 12) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

मोहम्मद सल्लाउद्दीन (वय 31), बाबुभाई नावाज (वय 31, दोघेही रा. कल्याण, बिदर, कर्नाटक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये नबीउद्दिन अधुनी (वय 26, रा. कल्याण, बिदर, कर्नाटक), मोहम्मद आझाद (वय 34, रा. तामिळनाडू) यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दिन हे तिघेजण त्यांच्या एका वाहनाने काही कामानिमित्त मुंबईला चालले होते. यादरम्यान त्यांचे वाहन खंडाळा बोगदा आणि अमृतांजन पुलाजवळ बंद पडले. या वेळी ते नाष्टा व चहा पिण्यासाठी दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस चौकीकडे एक्‍सप्रेस वे मार्गावरून चालले होते. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे सागवान लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक (टी.एन.52/एफ/4746) चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने मागून पुढे चालत असलेल्या मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दिनला धडक दिली. ट्रक मार्गालगच्या डोंगरावर आढळून मार्गावर उलटला. या घटनेत एकाचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस, “आयआरबी’चे देवदूत आपत्कालीन पथक आणि महामार्गावरील गस्ती पथकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तात्काळ उपचारासाठी निगडीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातामुळे मार्गावर सांडलेल्या ट्रकच्या ऑईलमुळे अपघात होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस व “आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकून मार्गावरील मातीची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक सुरू करण्यात आली. खोपोली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)