पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काकडे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन काकडे यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोस शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. आनंद केकाण उपस्थित होते. पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, असा ठराव 1978 मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. मात्र, ठरावाला 40 वर्षे पूर्ण झाली. तरीही अद्याप पुणे येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर शहरात खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार काकडे यांची भेट घेतली. त्यावेळी शहरात खंडपीठ सुरू करण्यासाठी सर्वत्तोपरी प्रयत्न करणार आहे. खंडपीठाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. फडणवीस आणि बारच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन काकडे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)