खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

पुणे – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून पैशासाठी कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालून पेट्रोल पंप फोडण्याची धमकी देऊन दर महिन्याला दहा हजारांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात हातकलंगले येथील टोळीच्या म्होरक्‍या सुदर्शन बाबर याच्यासह तिघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्या तिघांना शुक्रवारी पोलिसांनी येथील मोक्का न्यायालयात हजर केले. त्यावेळी विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राहुल उर्फ पांडु सदानंद माने (28), आकाश विद्याधर कांबळे (26) तर टोळी प्रमुख सुदर्शन शिवाजी बाबर (31, कारोची ता. हातकलंगले, जि. कोल्हापूर) अशी पोलीस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत राजु बाळासो इनामदार (21, रा. हातकलंगले) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी इनामदार हे हातकलंगले ते इचलकरंजी रस्त्यावर असणाऱ्या भंडारे पेट्रोल पंपावर कामास आहेत. सुदर्शन बाबर याच्या सांगण्यावरून आरोपी माने आणि कांबळे भंडारे पेट्रोल पंपावर आले. तेथे इनामदार यांच्याकडून 50 रुपयांचे पेट्रोल भरून घेतले. दरम्यान, इनामदार यांनी पेट्रोलचे पैसे मागितल्यानंतर मागे पेट्रोल पंप फोडला माहिती नाही का, असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ करून मालकाला प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची खंडणी देण्यासाठी सांग म्हणून धमकी दिली. तसेच इनामदार यांना मारहाण करून पुढील वेळी फुकट पेट्रोल भरण्याबाबत दम देऊन इनामदार यांच्याजवळी 650 रुपये जबरी चोरी करून नेले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना मोक्का न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)