खंडणीसाठी 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप

पुणे – खंडणीसाठी बारा वर्षाच्या शाळकरी मुलाचे अहपरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
अरविंदसिंग श्रीसत्यदेवसिंग पटेल (27) आणि शिवबहाद्दूरसिंग अव्हदारनसिंग पटेल (दोघेही रा. 35, औतरीला, मध्यप्रदेश) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 12 वर्षीय मुलगा सुभाष याच्या अपहरण प्रकरणी त्याचे वडील अशोककुमार जयपाल सिंग (38, कुमार प्रॉपर्टीज पार्क, इन फेनिया, फुरसुंगी, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 10 फेब्रुवारी 2013 रोजी घडली.
अशोककुमार हे फुरसुंगी येथे त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्यास असून, त्यांना बारा वर्षाचा मुलगा आहे. ते त्यांच्या भावाच्या हॉस्पीटलमध्ये जेजुरी येथे कंपाऊंडर म्हणून नोकरी करतात. ते मूळचे मध्यप्रदेशचे आहेत. सुभाष हा हडपसर येथील ससाणेनगर येथील शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. दि. 10 फेब्रुवारी 2013 रोजी अशोककुमार यांना त्यांच्या वहिणीचा फोन आला की, सुभाष हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून सायकल खेळण्यासाठी गेला, तो अद्याप परतला नसल्याचे सांगितले. त्याचा दोन दिवस शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी लोणी काळभोर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना एका मोबाईवरून फोन आला. फोनवर तुझा मुलगा माझ्या जवळ आहे, कोणालाही काही सांगायची गरज नाही, अशी धमकी देऊन तीन लाखांची खंडणी मागण्यात आली. तसेच ते पैसे जबलपूर येथे नेवून देण्यास सांगण्यात आले. त्यावेळेस मुलाबरोबर बोलायचे आहे, असे सांगितल्यानंतर मुलाने हॅलो म्हणल्यनंतर आरोपीने लगेच फोन कट केला. त्यानंतर फोन लावण्याचा प्रयत्न करून फोन लागला नाही. याबाबत तक्रारदारांनी उरूळी देवाची पोलिस चौकीत माहिती दिली. त्यानंतर दि. 12 फेब्रुवारीला तक्रारदारांच्या भावाच्या मोबाईलवर फोन आला. फोनवर अपहरणकर्त्यांनी कुठपर्यंत आला आहे, अशी विचारणा करताना तीस लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी फोन बंदकरून पुन्हा पाच वाजता फोन करतो, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुलाची सुटका करून दोघांच्या दि. 16 फेब्रवारी 2013 रोजी मुसक्‍या आवळल्या. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी काम पाहिले. पीडित मुलगा, मुलाचे वडील, तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाला कोर्टकामी पोलीस हवालदार जगन्नाथ भोसले, पोलीस नाईक पी. एन भागवत आणि पोलीस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)