खंडणीसाठी मुलाचे अपहरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप

पुणे- खंडणीसाठी बारा वर्षीय शाळकरी मुलाचे अहपरण करणाऱ्या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.

अरविंदसिंग श्रीसत्यदेवसिंग पटेल (27) आणि शिवबहाद्दूरसिंग अव्हदारनसिंग पटेल (दोघेही रा. 35, औतरीला, मध्यप्रदेश) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अपहृत मुलगा सुभाष याचे वडील अशोककुमार जयपाल सिंग (38, कुमार प्रॉपर्टीज पार्क, इन फेनिया, फुरसुंगी, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना 10 फेब्रुवारी 2013 रोजी घडली.

अशोककुमार हे फुरसुंगी येथे त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्यास असून, त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. ते त्यांच्या भावाच्या जेजुरी येथील हॉस्पीटलमध्ये कंपाऊंडर म्हणून नोकरी करतात. ते मुळचे मध्य प्रदेशचे आहेत. सुभाष हा ससाणेनगर (हडपसर) येथील शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता. दि. 10 फेब्रुवारी 2013 रोजी अशोककुमार यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला की, सुभाष हा संध्याकाळी सहा वाजल्यापासून सायकल खेळण्यासाठी गेला, तो अद्याप परतला नसल्याचे सांगितले. त्याचा दोन दिवस शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी लोणी काळभोर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांना तीन लाखांच्या खंडणीसाठी फोन आला. त्यावेळी फोनवरील व्यक्तीने कोणालाही काही न सांगण्याचे धमकावत पैसे जबलपूर येथे नेवून देण्यास सांगितले. आलेल्या नंबरवर परत फोन लावण्याचा प्रयत्न केला असता लागला नाही. याबाबत तक्रारदारांनी उरूळी देवाची पोलीस चौकीत माहिती दिली. त्यानंतर दि. 12 फेब्रुवारीला तक्रारदार यांच्या भावाच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी कुठपर्यंत आला असे विचारत तीस लाख रुपयांची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी फोन बंदकरून पुन्हा पाच वाजता फोन करतो, असे सांगितले. त्यानंतर दि. 16 फेब्रवारी 2013 रोजी पोलिसांनी सापळा रचून मुलाची सुटका करून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या. याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास पटारे यांनी काम पाहिले. पीडित मुलगा, वडील, तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाला कोर्टकामी पोलीस हवालदार जगन्नाथ भोसले, पोलीस नाईक पी. एन. भागवत आणि पोलीस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)