खंडणीखोरांना चाप लावा; अन्यथा रस्ता रोखू

शिवसेनेचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा : प्रभातच्या वृत्ताने शेतकरी एकवटले

पळसदेव- उजनी धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्याने उजनी काठावरच शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे.पाण्याअभावी पिके जळून गेली आहेत. पाईप, केबल वाढवून शेतकरी पुरता बेजार झाला आहे. त्यात सरकारी ओढ्यावर कृषिपंप बसवण्यासाठी गावगुंडांना द्यावी लागणारी खंडणी आदी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या जीव वैतागला आला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तातडीने थांबला; अन्यथा पळसदेव येथे रास्ता रोको केला जाईल, असा इशारा इंदापूर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विशाल बोंद्रे दिला आहे. कृषिपंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांभोवती फास, असे वृत्त “प्रभात’ने प्रसिद्ध केल्यानंतर शनिवार (दि.25) पळसदेव येथे धुमाळीच्या पुलावर शेतकऱ्यांची बैठक पार पडली. खंडणी मागणाऱ्यांवर कायदेशीवर कारवाई करावी, या मागणीसाठी जलसंपदा मंत्र्यांच्या कोर्टात जाणार असल्याचे इंदापूर शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विशाल बोंद्रे यांनी सांगितले.

पळसदेव येथे बोंद्रे यांनी शेतकऱ्यांशी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत माहिती घेतली. सोमवारी याबाबत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन उजनी काठावर शेतकऱ्यांची होणारी अडवणुकीची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्याकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. सध्या पळसदेव भागात अनेक स्थानिक शेतकरी सरकारी ओढ्यावर कृषिपंप बसवण्यासाठी पैसे घेत आहेत, हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. राज्य शासनाने अगोदरच धरणग्रस्तांना मोबदला दिला आहे. मग या जमिनीवर सध्या शासनाचा अधिकार आहे. या प्रकारे शासकीय जमिनीत कृषिपंप बसवण्यासाठी चारी काढणे यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी देऊ नये. पैसे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्याकडे करणार आहे.

केवळ पळसदेव भागात किमान एक ते दीड कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याही कृषिपंपाचे नुकसान होईल, या भीतीने तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. याबाबत पोलीस प्रशासन माहिती असूनही केवळ आर्थिक लाभामुळे गप्प बसले असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात आला आहे. त्यामुळे खंडीखोरांचा धुडगूस अधिकच वाढला आहे. दरम्यान, पळसदेव भागात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असताना खंडणी वसूल केली जात असताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

  • शेतकऱ्यांच्या जीवावर खंडणीखोर पोसले
    दरवर्षी उजनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यावर चारीतून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना खंडणीखोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत कर्ज काढून, उसनवारी करून शेतकरी पिके जगवित आहे. मात्र, हे खंडणीखोर शेतकऱ्यांच्या जीवावर पोसत आहेत. घरातील सोनं गहाण ठेऊन पाईप व केबल आणण्यासाठी शेतकरी पैसा जमा करीत आहे. त्यात याप्रकारे चारीवर कृषिपंप बसविण्यासाठी रक्‍कम कोठून आणायची, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा पाय कर्जाच्या गाळात रूतला जात आहे.
  • शेतकऱ्यांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती द्यावी. त्यासाठी काहीही मदत लागली तर आम्ही तयार आहोत. गरज पडल्यास तहसलिदार, प्रांताधिकारी यांच्याकडे जाऊन गाऱ्हाणी मांडणार आहे. त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाही करण्याची मागणी करणार आहे.
    बाळासाहेब काळे पंचायत समिती सदस्य, इंदापूर.
    विशाल बोन्द्रे माजी इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)