क्‍लस्टर धोरणाबाबत अंतिम प्रक्रिया सुरू

मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर : नगररचना संचालनालयाचा अहवाल मागवला

पुणे – शहरातील जुने वाडे, चाळी, गावठाण यांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने नगररचना संचालनालयाचा अहवाल मागवला असून तो मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. यामुळे क्‍लस्टर डेव्हल्पमेंटचा विषय लवकरच मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-

महापालिकेने हे धोरण मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवले होते. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. याबाबत आमदारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मुख्यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले आहे.

महापालिका हद्दीतील दाट वस्ती क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात क्‍लस्टर डेव्हल्पमेंट संकल्पना प्रस्तावित करण्यात येऊन हा आराखडा “महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम 1966′ अन्वये प्रसिद्ध करण्यात आला होता. हा आराखडा विहित कालावधीत महापालिकेने राज्य सरकारला सादर न केल्याने याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने यामध्ये काही बदल करून तो मान्यतेसाठी सादर केला होता.

या योजनेला सरकारने 5 जानेवारी 2017 रोजी मान्यता दिलेली असून त्यानंतर या योजनेबाबत 3 जुलै 2017 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार क्‍लस्टर डेव्हल्पमेंट बाबतचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून, महापालिकेने “इम्पॅक्‍ट ऍसेसमेंट रिपोर्ट’ सादर केल्यानंतर या विषयाला मान्यता देण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही प्रलंबित आहे, असेही उत्तरात म्हटले आहे.

यानंतर महापालिकेने 24 जुलै रोजीच्या पत्रान्वये “क्रिसिल’ या संस्थेने तयार केलेला “इम्पॅक्‍ट अॅसेसमेंट रिपोर्ट’ सादर करून हा विषय मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या विषयाला नगररचना संचालनालयाचा अहवाल आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)