पुणे : क्‍यु नेट कंपनीकडून ५० लाखाची फसवणूक

सिंहगड रोड पोलिसांनी केली एकाला अटक 


न्यायालयाने सुनावली त्याला पोलीस कोठडी

पुणे- क्‍यु नेट कंपनीचे बिझनेसद्वारे कोट्यावधी होण्याचे अमिष दाखवून अनेकांना 50 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली असून, आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान अटक केलेल्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 20 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांनी दिला.
प्रितम दिलीप पैठणकर (वय 38, रा. सिंहगड रोड) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत पराग सतीश कर्वे (वय 28, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 15 जानेवारी 2015 ते आतापर्यंतच्या कालावधीत घडली. प्रितम आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी क्‍यु नेट बिझनेसद्वारे कोट्यावधी होण्याचे स्वप्न दाखविले. या बिझनेसमध्ये जेवढे पैसे गुंतवण्यात येतील, त्यावर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे मित्र आणि नातेवाईक असे एकुण 14 जणांनी 50 लाख 70 हजार रुपये गुंतविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रितम याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तो आणि त्याचा भाऊ गुन्हा नोंद झाल्यानंतर परदेशात पळून गेले होते. हे त्यांच्या जप्त केलेल्या पासपोर्टवरून दिसून येत आहे. गुन्ह्यातील रक्कम परदेशात पाठविली आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)