क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेस मान्यता

दोन कार्यालयांची वाढ : सांगवी व थेरगाव कार्यालयाची भर

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांची नव्याने पुनर्रचना करुन ती आठ क्षेत्रीय कार्यालये बनविण्यास आयुक्‍तांचा ऐनवेळच्या विषयाला सर्वसाधारण सभेने आज (शुक्रवारी) मान्यता दिली. त्यानुसार सांगवी व थेरगावमध्ये नवीन क्षेत्रीय कार्यालय होणार असून, महापालिकेची आता सहा ऐवजी आठ क्षेत्रीय कार्यालये होणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीनुसार घेण्यात आल्या. त्यामुळे पुर्वीचे असणारे दोन सदस्यीय प्रभागात मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करण्यात आली. त्या प्रभागांचे एकत्रित चार प्रभाग बनविण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या पुर्वीच्याच सहा क्षेत्रीय कार्यालयांची देखील प्रशासनाने पुनर्रचना केली आहे.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 29 (अ)(1) मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिका ठरवील, अशा लागून असलेल्या निवडणूक प्रभागांचा समावेश असणाऱ्या प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली. त्यानुसार शहराची लोकसंख्या विचारात घेवून आठ प्रभाग समित्यांची नव्याने रचना करण्याचा प्रस्ताव आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. महापालिकेचे पूर्वी असलेले अ, ब, क, ड, ई आणि फ अशा सहा क्षेत्रीय कार्यालयात वाढ करुन ग आणि ह असे दोन क्षेत्रीय कार्यालये नव्याने बनविले आहेत. या नव्याने आठ प्रभाग समित्यांची रचना करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)