क्षेत्रीय कार्यालयांचा स्वच्छतेकडे कानाडोळा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध संस्था, कंपन्यासह नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. शहरात अनेक नागरिक रस्ते, मार्गावर घाण करु लागले आहेत. याकडे महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने नागरिक त्या नियमांचे उल्लंघन करु लागले आहेत. याकडे आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाल्याने शहर अस्वच्छतेचे बोजवारा वाजला आहे.

अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ठ परिणाम होवू लागल्याने महाराष्ट्र प्लॉस्टीक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक बंदी घालण्यात आली. तसेच, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आदेशानूसार घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. या नियमांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही.

शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 च्या तरतुदीचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकांना 30 डिसेंबर 2017 अन्वये प्रदान केले आहेत. मात्र, महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सदरील नियम व तरतुदींचे सर्रास उल्लंघन करुनही नागरिकांसह संस्थावर दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. यामध्ये रस्ते, मार्गावर घाण करणे (दंड 180 रुपये), सार्वजनिक ठिकाणी थुंकणे (दंड 150 रुपये), उघड्यावर लघुशंका करणे (दंड 200 रुपये), उघड्यावर शौच करणे (दंड 500 रुपये) अशी कारवाईची तरतूद असताना आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.

कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न
नागरिकांनी विघटनशील-कुजणारा किंवा ओला, अविघटनशील- न कुजणारा किंवा सुका आणि घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा स्वतंत्रपणे देवून स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या व्यक्तीकडे देणे बंधनकारक आहे. या देखील नियमांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन नियम व 2016 मधील तरतुदीचे अनुपालन करण्यात येत नसल्याने केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)