क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांनी अनुभवले ऊर्जा बचतीचे महत्त्व

भोर- विद्यार्थ्यांचे मनोरंजन, सृजनशिलता, व्यावहारिक दृष्टिकोन, नावीन्याचा शोध, शालाबाह्य शिक्षण आणि निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण आदी उद्दिष्टे विद्यार्थ्यांना साध्य व्हावीत यासाठी येथील राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विता वीर यांच्या कल्पकतेतून क्षेत्रभेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेट उपक्रमात 5वी ते 7वीच्या वर्गातील 350 मुले सहभागी झाली होती. केंजळ (ता. भोर) येथील विघ्नहर्ता ऊर्जा पार्क या महाराष्ट्रात दिशादर्शक ठरलेल्या ऊर्जा निर्मिती केंद्रातील सौरऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जेचे महत्त्व, सौर ऊर्जेचा वापर, त्यावर आधारित उपकरणे, त्यांचा वापर आणि ऊर्जा बचतीचे महत्त्व याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थांनी जाणून घेतली. या क्षेत्रभेट उपक्रमात विद्यालयातील 3 री व 4 थी च्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या नगदी पिकांच्या रोपांची निर्मिती करणाऱ्या हारतळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील थोपटे बायोटेक या कंपनीस भेट देऊन माहिती देण्यात आली. पॉली हाऊस, बांबूची रोपवाटिका, शोभेची रोपे, बरणीतील रोपे आणि तुषार सिंचन याविषयी विद्यार्थ्यांना कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आली. या क्षेत्रभेट उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)