क्रेझ वाढवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात एक महिला आणि पुरुषाला सापळा रचून केले जेरबंद

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.31 – महाविद्यालयात स्वत:ची “क्रेझ’ वाढवण्यासाठी खरीखुरी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. या मुलाकडे पिस्तूल कसे आले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच, पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एक महिला आणि पुरुषाकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त करून अटक करण्यात आली.

-Ads-

बजरंग सिद्धरामय्या गायकवाड (35, रा. मुंढवा) आणि आसमा मुजाहिद सय्यद (30, रा. अराफत मशीदीजवळ पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या दोघा मोबाईल चोरट्यांची नावे आहेत; तर पिस्तूल बाळगणाऱ्या सतरा वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन विधीसंघर्षित मुलगा तेंडूलकर गार्डन जवळ येणार असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाबा दांगडे व पोलीस शिपाई संजय बनसोडे यांना त्याच्या बातमीदाराकडून मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी लागलीच तेंडूलकर गार्डन जवळ सापळा रचला आणि बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार संशीत मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ देशी बनावटीचा कट्टा आणि एक काडतुस सापडले. मुलाने पिस्तूल कोठून आणले, कशासाठी आणले याबाबत विश्रामबाग पोलीस तपास करीत असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. तसेच, विश्रामबाग पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली. त्यामध्ये आसमा मुजाहिद सय्यद या महिलेचा समावेश असून, बजरंग गायकवाड यालाही अटक करण्यात आली. बजरंग याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा तर, आसमा हिच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत शिंदे, अमृत मराठे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार वाकसे, पोलीस नाईक बाबा दांगडे, शिपाई संजय बनसोडे, सचिन जगदाळे, चेतन शिरोळकर, रेखा बनकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)