क्रूडचा विकासदरावर परिणाम

चालू आर्थिक वर्षातील विकासदर केवळ 7.3 टक्‍के होण्याचा अंदाज
नवी दिल्ली – क्रूडचे दर वाढले आहेत. त्याचा एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर तोटा वाढलेल्या बॅंकांचे कर्ज वितरण कमी होणार असल्यामुळे भारताचा या वर्षाचा विकासदर 7.3 टक्‍के होण्याची शक्‍यता असल्याचा सुधारित अंदाज मुडीज या पतमानांकन संस्थेने व्यक्‍त केला आहे.
याअगोदर या संस्थेने भारताचा या वर्षाचा विकासदर 7.5 टक्‍के इतका राहील असा अंदाज जाहीर केला होता. भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येत आहे. मात्र, दरम्यानच्या काळात बॅंकाची परिस्थिती बिघडली आहे. त्याचबरोबर क्रूडचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे याचा भारताला काही प्रमाणात नकारात्मक परिणाम सहन करावा लागणार आहे.

सरकारने बॅंकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू केले आहेत. बॅंकांना भांडवली मदत मिळणार आहे. त्याचबरोबर आजारी कंपन्यांना इतर कंपन्यांना विकत घेण्याची मुभा देणारी नादारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात बॅंकांची परिस्थिती सुधारण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यासाठी बराच काळ लागणार आहे. दरम्यानच्या काळात बॅंकांच्या कर्ज वितरणावर परिणाम होणार आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेने काही बॅंकांना मर्यादित कर्ज देण्याच्या सूचना केल्या आहेत.

या दोन बाबीचा परिणाम या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर होणार आहे. त्यामुळे सध्याच्या वर्षाचा विकासदर 7.3 टक्के होण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षात विकासदर 7.5 टक्‍के राहील याबाबत मुडीज आशावादी आहे. या वर्षी पाऊस चांगला पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून मागणी वाढणार आहे. सरकारने किमान आधारभूत किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जर खरेच वाढविल्या तर ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढणार आहे. मात्र, त्यामुळे काही प्रमाणात महागाई वाढू शकते असे या संस्थेला वाटते.

काही महिन्यांनंतर बॅंका सुरळीत कर्ज वाटप करू शकणार आहेत. त्यानंतर कमी झालेली खासगी गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यानच्या काळात नादारी आणि दिवाळखोरी यंत्रणेचे काम व्यवस्थित सुरू राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर सरकारने जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली आहे.
त्या आघाडीवर आतापर्यंतचे काम चांगले आहे. काही महिन्यानंतर या यंत्रणेतून चांगला महसूल मिळण्याची शक्‍यता असल्याचे मुडीजने म्हटले आहे. यामुळे भारतात उद्योग करणे अधिक सोपे झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)