क्रुड वधारल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही – प्रधान 

नवी दिल्ली: जागतिक परिस्थितिजन्य कारणामुळे गेल्या काही आठवड्यात क्रुडचे दर वाढल्यानंतर याचा फार नकारात्मक परिणाम होईल, असे बोलले जाऊ लागले आहे. मात्र, यात फारसे तथ्य नाही. अशा परिस्थितीचा सामना भारताने या अगोदर अनेकवेळा यशस्वीरित्या केला आहे. भारताकडे पुरेसे परकीय चलन असल्यामुळे चिंतेची गरज नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 
ते म्हणाले की, भारतासारख्या स्थिर अर्थव्यवस्थेवर अशा बाबीचा परिणाम जास्त होत नसतो. एक तर तेलाचे उत्पादन घेणाऱ्या देशानी जगाला दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे तेलाच्या उत्पादनात वाढ केलेली नाही. त्याचबरोबर इराण, व्हेनेझुएला, तुर्कस्तानातील राजकीय पेचामुळे तेलाचा पुरवठा कमी होत असल्यामुळे तेलाचे दर वाढत आहेत. यातून जगातील अनेक देश मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
रुपयाच्या घसरण्यापेक्षा आम्हाला चालू खात्यावरील वाढत असलेल्या तुटीची चिंता आहे. ही तूट कमी केल्यानंतर इतर प्रश्‍न आपोआप कमी होतात असे त्यांनी सांगितले आहे. 
आपण रुपयाच्या मूल्याला फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. कारण, रुपया घसरत असतो तेव्हा निर्यात करणाऱ्यांना त्याचा अधिक फायदा होतो. तसे होत असतानाच आयात करणाऱ्यांना मात्र त्याचा त्रास होतो. विशेषतः क्रुड आयात करणाऱ्या कंपन्यांना महाग क्रुड विकत घेतल्यामुळे इंधनाचे दर वाढतात आणि नंतर महागाई वाढते. त्यामुळे रुपयाच्या योग्य मूल्यावरील संतुलनाला महत्त्व असते आणि तसे संतुलन चालू खात्यावरील तूट नियंत्रणात असल्यास शक्‍य होते, असे त्यांनी सांगितले. 
रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घसरल्यानंतर चलनबाजारात खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतरही शेअर बाजारावर या घडामोडीचा फारसा परिणाम झाला नसल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धानंतर डॉलर वधारत आहे आणि त्याचबरोबर चीनचे चलन यूआन घसरत आहे. या कारणाने रुपयाचे मूल्य या वर्षात आतापर्यंत 9 टक्‍क्‍यांनी कमी झालेले आहे. चालू खात्यावरील तूट नियंत्रणात ठेवण्याबरोबरच वित्तीय तूटही नियंत्रणात ठेवण्याची आवश्‍यकता आहे त्यासाठी महागाई रोखण्याकरिता रिझर्व्ह बॅंक योग्यरित्या व्याजदरात वाढ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक आणि पाच वर्षांसाठीच्या नियोजनाबाबत काम वेगाने चालू असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)