शेअर खरेदी वाढली; सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकात भरीव वाढ 
मुंबई – गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात क्रुडचे दर बरेच कमी झाले आहेत. रशियासह इतर काही देशांनी क्रुडचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यातही बरीच सुधारणा झाली आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारात उमेद परत आली आहे. काल सलग तिसऱ्या दिवशी त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात चांगलीच सुधारणा झाल्याचे दिसून आले. सध्या निर्देशांकाना रिटेल गुंतवणूकदार आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदार चांगलाच आधार देत आहेत. मात्र अजूनही परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी केलेली नाही.

काल पुन्हा क्रुडचे दर 1.88 टक्‍क्‍यानी कमी होऊन 75 डॉलर प्रती पिंपावर आले आहेत. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात क्रुडचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. क्रुडचे दर जास्त वाढू देऊ नयेत असा ईशारा अमेरिकेने क्रुड उत्पादक देशाना दिला आहे. त्याबरोबर सकाळी रुपयाचे मूल्य चांगलेच वधारले. त्याचबरोबर आशियाई बाजारातून सकारात्मक संदेश आले. उत्तर कोरिया आणि अमेरिका चर्चा करण्याची शक्‍यता वाढली असल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले.

शेअर बाजारांनी जाहीर केलेल्या माहिती नुसार शुक्रवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 887 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. मात्र परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 786 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
भांडवली वस्तू कंपन्याच्या शेअरची आज मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 240 अंकानी म्हणजे 0.69 टक्‍क्‍यांनी वाढून 35165 अंकावर बंद झाला. सेन्सेक्‍स 35 हजारांच्या वर बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 83 अंकानी म्हणजे 0.79 टक्‍क्‍यांनी वाढून 10688 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असणारा मान्सून वेळापत्रकाप्रमाणे भारतात दाखल झाला आहे. त्याचाही शेअर बाजारातील व्यवहारावर सकारात्मक परिणाम होत आहे. गेल्या आठवड्यात तेल कंपन्याचे शेअर घसरले होते. मात्र आता तेल कंपन्याचे शेअर वधारू लागले आहेत. त्याचबरोबर विमान वाहतूक कंपन्याचे शेअरही वधारले. लवकरच वाहन कंपन्याची विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याबाबात आशावादी असलेल्या गुंतवणूकदाराकडून खरेदी होत आहे. रुपया घसरत असल्यामुळे आतापर्यत तेजीत असलेले माहिती तंत्रज्ञान कंपन्याचे शेअर रुपया वधारू लागल्यामुळे पिछाडीवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)