क्रीडा शिबिरांतून गुणवत्ता मिळावी! 

अमित डोंगरे 

उन्हाळी शिबिरांचे पेव तर दरवर्षी देशभर फुटते. मात्र, त्यात प्रशिक्षण देणारी व्यक्ती स्वतः किती दर्जेदार खेळली आहे, तिचे व्यक्तिमत्त्व कसे आहे किंवा एकंदर ‘कुंडली’ काय आहे, हे प्रथम माहीत करून घ्यावे. दोन महिन्यांच्या शिबिरात काय तंत्र चुकते किंवा काय खेळता येते, हेच समजू शकत नाही, मग चुका सुधारणे वगैरे तर खूपच कठीण गोष्ट आहे. प्रत्येक खेळाच्या जिल्हा किंवा राज्य संघटनेची संलग्न असणाऱ्या शिबिरातच खेळाडूला प्रवेश घेऊन दिला, तर ‘मार्ग’ चुकणार नाही व ‘रस्ता’ निश्‍चितच सापडेल. 

मला सचिन, सानिया किंवा विराट व्हायचंय असे म्हणत आजची मुले-मुली क्रीडा प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रवेश घेतात. पालक देखील अत्यंत महागडी सामग्री विकत घेऊन देतात आणि आपल्या पाल्याने ‘स्टार’ खेळाडू बनावे यासाठी धडपड करतात. मात्र, ही शिबिरे खरेच त्या दर्जाची आहेत का, हे पाहण्याची, साधी तसदी देखील कोणी घेत नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ही शिबिरे सुरू होतात आणि ‘स्व-हितं ध्येयंम’ करत बंद होतात. मग ‘शिबिरे झाली भरघोस’ आणि ‘गुणवत्ता पडली ओस’ हेच चित्र दिसते. वास्तविक मोठा खेळाडू बनावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्याहीपेक्षा आपल्या पाल्याने ‘स्टार’ बनावे ही प्रत्येक पालकाची इच्छेपेक्षा महत्त्वाकांक्षा असते, पण काही पालक हा विचार करतात की, परीक्षा झाली, आता ‘याला’ घरात ठेवण्यापेक्षा 2-4 तास खेळण्यासाठी पाठवावे, म्हणजे घरात त्रास देणार नाही. नेमके याच मनोवृत्तीचा फायदा ‘शिबिरे’ आयोजित करणारी मंडळी घेतात. 500 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिरे शुल्क आकारतात, पण इथे खरोखर क्रीडा नैपुण्य, गुणवत्ता यांचा कस लागतो का?

पुण्यातील काही मैदानांवर क्रिकेट शिबिरे विपुल प्रमाणात भरतात, पण मग त्यातून गेल्या कित्येक वर्षांत राज्याला क्रिकेटपटू किती मिळाले? ज्या क्‍लबला एक प्रतिष्ठा आहे त्यात सहभागी झालो तरच राज्यसंघाकडून खेळण्याची संधी मिळते, ती देखील तुमची कामगिरीही खूपच सातत्यपूर्ण असली तरच. ज्या क्‍लबना केवळ ‘मोसमात उमलणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या’ म्हटले जाते, तिकडे सराव करून वेळ वाया जातो. हाती काही लागत नाही, हे वास्तव आहे.
मला भेटलेले एक पालक म्हणाले, ”राष्ट्रीय किंवा राज्य संघात आमचा मुलगा खेळला नाही तरी चालेल, त्याला आयपीएल खेळण्याची जरी संधी मिळाली तरी त्याच्या चार पिढ्यांची काळजी मिटेल.” म्हणजे बघा आता, आयपीएलमुळे शिबिरातील खेळाडूंच्या पालकांचे डोळे किती विस्फारलेत! त्यांना राज्य किंवा राष्ट्रीय संघ नको, पण ‘आयपीएल सर्कस’ चालणार आहे. मानसिक दिवाळखोरी म्हणतात ती ही.

आज विविध मैदानांवर किंवा क्रीडा संकुलात क्रिकेटच नव्हे, तर इतर अन्य खेळांची जी शिबिरे सुरू असतात त्यात ‘आर्थिक प्राप्ती’ व्यतिरिक्त बाकी सगळी औपचारिकता असते आणि हीच अत्यंत धोकादायक आहे. या शिबिरांना प्रवेश घेण्याऐवजी शालेय, महाविद्यालयीन, क्‍लब व राज्य संघांसाठी खेळायला व राज्य संघटनेशी संलग्न असणाऱ्या शिबिरांना प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा ‘रात गयी बात गयी’ सारखे शिबिर संपले, उद्देश संपला, अशीच परिस्थिती राहते.
मुळात अशा शिबिरांमध्ये 50-60 खेळाडू खेळत असतात. हे शिबिर साधारण एप्रिल ते जून या काळात होते, त्यामुळे केवळ दीड-दोन महिन्यांत कोणताही प्रशिक्षक कोणत्याही खेळाडूकडे लक्ष देऊ शकत नाही. खेळाडूंनी वर्षभर चालणाऱ्या शिबिरात प्रवेश घेतला तरच प्रशिक्षकांना एकेका खेळाडूला वैयक्तिक मार्गदर्शन देता येते, ‘स्टार’ खेळाडू अशा शिबिरांमधूनच तयार होतो.

‘ड्रॉप आऊट’ कसे रोखणार? 
खेळाडूंच्या ऐन उमेदीच्या काळात ‘ड्रॉप आऊट’ सारखी समस्या निर्माण होते. आपली शिक्षण पद्धतीच क्रीडा क्षेत्राला मारक असते, हेच यातून दिसते. कोणताही मुलगा किंवा मुलगी कोणत्याही खेळात घडत असतात, तेव्हा पालक दहावी किंवा बारावीच्या वर्षी त्यांच्या खेळावर बंधन आणतात. आधी शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण जर खेळाडू खेळाबरोबरच अभ्यासातही साथ देत असेल तर अभ्यासासाठी खेळ का बंद करण्यात येतो? एक वर्षाची खेळातील सुट्टी या खेळाडूसाठी क्रीडा क्षेत्रातील यशाचे दरवाजे बंद करणारी ठरते. सचिन तेंडुलकरला, सानिया मिर्झाला किंवा अशाच अनेक खेळाडूंना त्यांच्या पालकांनी प्रोत्साहन दिले याच्या कथा आपण आवडीने वाचतो, पण तेच आपल्या मुला-मुलींसाठी करत नाही. त्यांना खेळाडू बनविण्याऐवजी कारकून बनविण्यासाठी आपण अट्टाहास का करतो? आताचा काळ बदललाय मात्र, मनोवृत्ती पुरातनच आहे. ‘क्रांतिकारी जन्माला यावा, पण तो शेजारच्या घरात’ ही मानसिकता असते. एक सचिन यशस्वी ठरतो; पण अशा अनेक ‘सचिन’ होऊ पाहणाऱ्या खेळाडूंचे नुकसान बाहेरच्या नव्हे तर घरातल्याच ‘बचावात्मक’ मनोवृत्तीच्या पालकांमुळे होते. मराठी माणूस पूर्वी व्यवसाय करायला घाबरत असे, आज धाडस करायलाही घाबरतो, न जाणो आपला मुलगा किंवा मुलगी क्रीडा क्षेत्रात अपयशी ठरले तर मग पुढील आयुष्यात त्यांना ‘टक्के-टोणपे’ खावे लागतील, ही भीती आधी असते, पण त्यांना आपला पाल्य खेळाबरोबरच शिक्षणातही गांभीर्याने वाटचाल करेल हा विश्‍वास का वाटत नाही.

‘पाठिंबा’ घरातूनच मिळायला हवा. तो बाहेरची व्यक्ती देणार नाही किंवा पुढे किंमतही मिळत नाही. क्रीडा क्षेत्र पूर्वी फक्त श्रीमंतांचेच, असा समज होता. मात्र, आज तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांचीसारख्या गावातून आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे. घरातील व्यक्तींकडून योग्य वेळी पाठिंबा, योग्य वयातच खेळातील प्रशिक्षणाला सुरुवात व वेळेवर मिळालेली संधी कधीच कोणाला अपयश दाखवणार नाही. एकवेळ खेळाडू म्हणून यश नाही मिळवता आले तर प्रशिक्षक, पंच, सामना अधिकारी या आणि अशा कितीतरी संधी उपलब्ध आहेत.

जर एक डॉक्‍टर आपला व्यवसाय सोडून अभिनयाचा मेरूमणी होतो तर खेळाडू देखील चांगला प्रशिक्षक किंवा समालोचक होऊ शकतो, हे डॉ. श्रीराम लागू किंवा सुनील गावसकर यांनी दाखवून दिलंय. आपल्या पाल्याला ‘लंबी रेस का घोडा’ बनवायचं असेल तर अशा ‘उन्हाळी शिबिरांमध्ये’ न घालता वर्षभर चालणारे प्रशिक्षण द्यावे. त्याचा खेळ व शिक्षण यांची प्रगती पाहावी व मगच त्यातून एकाची निवड करण्याची त्याला मुभा द्यावी तो नक्कीच यशस्वी होईल.

क्रीडा क्षेत्रातही आले आर्थिक स्थैर्य 
कोणताही खेळाडू मग तो पुरुष असो वा महिला कारकिर्दीबाबत खूप गंभीर असतात. मुख्य म्हणजे क्रीडा क्षेत्रात अपयश आले आणि शिक्षण असेल तर पोटापाण्याचा प्रश्‍न येणार नाही, अशी मानसिकता असते. आता क्रीडा क्षेत्रात ही भीती वाटण्याची गरज नाही. क्रीडा क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही ‘आर्थिक स्थैर्य’ मिळवू शकता. प्रशिक्षण, फिटनेस ट्रेनर, मेंटॉर, व्हिडीओ ऍनालिस्ट, पंच, रेफ्री, स्टॅटिस्टिशन, स्कोअरर या आणि अशा असंख्य संधी उपलब्ध आहेत. वर्षभर चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरातच या संधीची ओळख होते आणि शालेय शिक्षणाबरोबरच या क्षेत्रातील शिक्षणाचीही संधी मिळते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)