क्रीडांगण : वर्ल्ड कप हॉकीचे पडघम वाजले.

योगिता जगदाळे

आजच वृत्तपत्रांमध्ये एक बातमी वाचली आणि मन अतिशय प्रसन्न झाले. खरं तर बातमी प्रसन्न व्हावी अशी नव्हती, बातमी गोंधळाची होती, दंगल केल्याची होती, पण तरीही मन प्रसन्न झाले. अतिशय आनंद झाला. कारण हॉकी स्पर्धेची तिकिटे न मिळाल्यामुळे नाराज लोकांनी हुल्लडबाजी केली होती. आनंद यासाठी की भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आकृष्ट होत आहेत. याचा हा जिताजागता पुरावा आहे. तिकिट मिळाले नाही म्हणून दंगल करण्याइतकी लोकांमध्ये हॉकीची आवड निर्माण होत आहे, ही खरोखर आनंदाची बाब नाही का? नाही तर नुसते क्रिकेट एके क्रिकेट चालले आहे.

प्रसार माध्यमे क्रिकेटबद्दलची अगदी छोटी छोटी बातमीही फुगवून सांगतात. मात्र तेवढे लक्ष हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाकडे दिले जात नाही, किंवा दिले जात नव्हते असे म्हणू या. कारण हॉकी स्पर्धेची तिकिटे मिळाली नाहीत म्हणून हॉकी प्रेमींनी दंगल केली या इतकीच, किंबहुना थोडी जास्त महत्त्वाची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ज्येष्ठ हॉकीपटू आणि भारताचा माजी कर्णधार संदीप सिंग याच्या मेणाच्या पुतळ्याचे (वॅक्‍स स्टॅच्यू) उद्घाटन दस्तुरखुद्द संदीप सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. जयपूरमधील नहारगड येथील मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहालयात हा पुतळा ठेवण्यात आला. या प्रसंगी संदीप सिग यांना जयपूरमधील हॉकी खेळाडूंनी मानवंदना दिली.

वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा 28 नोव्हेंबरपासून भारतात ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वर येथे कलिंगा स्टेडियममध्ये सुरू होत आहे. जगातील या सर्वात मोठ्या, सर्वात महत्त्वपूर्ण हॉकी स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या बातम्या नक्कीच सर्वार्थाने महत्त्वाच्या आहेत. उत्साहवर्धक आहेत. हॉकीसंबंधी आणखीही मह्त्त्वाच्या बातम्या आहेत, पण त्याबद्दल शेवटी.

प्रथम वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेबाबत ः भुवनेश्‍वर येथे 28 तारखेपासून सुरू होत असलेली वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा ही खरं तर वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेपेक्षाही महत्त्वाची स्पर्धा. अनेक कारणांनी. एक तर या स्पर्धेत पाचही खंडातील देश सहभागी होतात. आजवर पात्रता फेरीतून या मुख्य स्पर्धेसाठी 24 देश पात्र ठरले असले, तरी सर्वच्या सर्व 14 स्पर्धांसाठी पात्र ठरण्याचा मान भारत, जर्मनी, स्पेन आणि नेदर्लंड या चारच देशांना मिळालेला आहे. क्रिकेट हा तसा राष्ट्रकुल देशांपुरता मर्यादित खेळ आहे, तर आयएफएच चे 138 देश सदस्य आहेत,

वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेची सुरुवात झाली 1971 साली. पाकिस्तानचे एयर मार्शल नूर खान यांची ही कल्पना आयएचएफ (इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन) ने उचलून धरली. आजवर वर्ल्ड कप हॉकीच्या 13 स्पर्धा झाल्या असून भुवनेश्‍वर येथे होणारी ही 14 वी स्पर्धा आहे. 1971 नंतर दोन दोन वर्षांनी 1973 आणि 1975 साली या स्पर्धां भरवण्यात आल्य्हा. पण 1975 पासून दर चार वर्षांनी याचे आयोजनकेले जाते. दोन ऑलिंपिक स्पर्धेत्रील काळात ही स्पर्धा भरवली जाते.

आजवरच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे वर्चस्व नजरेत भरण्यासारखे आहे. पाकिस्तान वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा चार वेळा जिंकली आहे, तर तीन वेळा पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाने तीन विजेतेपदे आणि दोन उपविजेतेपदे जिंकली आहेते. नेदर्लंडने तीन विजेतेपदे आणि जर्मनीने दोन विजेतेपदे मिळवली आहेत. एक विजतेपद भारताच्या वाट्याला आले, ते 1975 साली क्वालालम्पूर येथे.

कपिलदेवच्च्या संघाने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी आठ वर्षे. पण त्या विजयाची आठवण किती भारतीयांना आहे? त्यापूर्वीच्या स्पर्धेत 1973 साली भारताला नेदर्लंडकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्फ्वी 1971 साली भारताला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पहिल्या तीन स्पर्धांमध्ये अनुक्रमे तिसरे स्थान, उपविजेतेपद आणि विजेतेपद अशी प्रगती करणाऱ्या भारताला 1975 नंतर मात्र शेवटच्या चार संघांतही प्रवेश करता आलेला नाही. या वर्षी घरच्या मैदानावर ती कसर भरून काढण्याची भारताला चांगली संधी आहे.

या स्पर्धेसाठी 18 सदस्यांचा भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. या संघात पंजाबचे 9 खेळाडू असून पंजाबच्याच मनप्रीतसिंगकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे.
गोलकीपर : पीआर श्रीजेश, कृष्ण बहादुर पाठक
डिफेंडर : हरमनप्रीत सिंह, बिरेंद्र लाकरा, वरुण कुमार, कोठजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास
मिडफील्डर : मनप्रीत सिंह (कप्तान), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (उप-कप्तान), नीलकांत शर्मा, हार्दिक सिंह, सुमित
फॉरवर्ड : आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंह
स्पर्धेच्या आयोजनाबाबत बोलायचे, तर पहिली वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा स्पेनमधील बार्सेलोना येथे भरवण्यात आली होते. ती पाकिस्तानने यजमान स्पेनचा 1-0 असा पराभव करून जिंकली. त्यानंतर अनुक्रमे नेदर्लंड, मलेशिया, अर्जेंटिना, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांनी वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवले. मुंबई (1982) आणि नवी दिल्ली (2010) नंतर भुवनेश्‍वर (2018) असा भारताला तिसऱ्यांदा यजमानपदाचा मान मिळाला आहे. नेदर्लंड्‌स आणि मलेशिया यांनीही प्रत्येकी दोन वेळा वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे.

या वर्षी या स्पर्धेत प्रथमच 12 ऐवजी 16 देशांचे संघ सहभागी होत आहेत. त्यांची 4 गटात विभागणी केलेली आहे. भारताचा समावेश क गटात करण्यात आलेला आहे. 28 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा पहिला सामना बेल्जियम आणि कॅनडा या दोन देशांत, तर त्याच दिवशी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. अंतिम सामना 16 डिसेंबर रोजी होईल.

आगामी ऑलिम्पिक स्पर्धा 2020मध्ये जपानच्या टोकियो शहरात होणार आहेत. आयएचएफने त्यापूर्वी जागतिक पातळीवर हॉकीची लोकप्रियता वाढवण्यासाठी व हॉकीचा विकास करून हॉकी सर्वदूर पोहचवण्यासाठी हॉकी 2024 अंतर्गत हॉकी फॉर लाईफ आणि स्टिक्‍स फॉर द वर्ल्ड अशा दोन योजना आखल्या आहेत. हॉकी फॉर लाईफ अंतर्गत सर्व थरातील आणि सर्व वयोगटातील लोकांना हॉकी खेळण्यासठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे, आणि स्टिक्‍स फॉर द वर्ल्ड अंतर्गत 1 लाख 10 हजार हॉकी स्टिक्‍सचे वाटप करण्यात येणार आहे. आपल्या 46 व्या बैठकीत आयएचएफने हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत 112 देशाच्या 250 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आयएफएच के मुख्य कार्यकारी अधिकारी थियरे वेल यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)