#क्रीडांगण: देशाकडून खेळण्यास ताई बामणे सज्ज! (भाग-१)

अमित डोंगरे 
भारतीय क्रीडा क्षेत्रात आता शहरी खेळाडूंपेक्षा ग्रामीण भागातील खेळाडू जास्त संख्येने आपल्या कामगिरीच्या जोरावर यशस्वी होताना दिसत आहेत. युवा धावपटू ताई बामणे हे त्यातीलच एक उदाहरण. मोठ्या स्तरावर जी गुणवत्ता हवी असते आणि जो पाठिंबा हवा असतो, तो ताईला तिच्या योग्य वयातच मिळत आहे. त्यामुळे भविष्यात भारताला ऑलिम्पिक दर्जाची धावपटू मिळेल याची खात्री वाटते. 
क्रीडा क्षेत्रात प्रत्येक खेळाडूचे एक स्वप्न असते. ते म्हणजे आपण ज्या खेळात कारकीर्द करत असतो, त्या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करावे. अनेक खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे स्वप्न पूर्ण करतात. यातच आता ताई बामणे या धावपटूचे नाव समाविष्ट झाले आहे.
नाशिक शहराने राज्याला आणि देशाला अनेक नामवंत खेळाडू दिलले आहेत. त्यात आता ताईचे नावही समाविष्ट झालेले आहे देशपातळीवर! बॅंकॉक येथील पात्रता फेरीतील पंधराशे मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवले आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धा यंदा अर्जेटिनामध्ये होणार आहे.
लहानपणापासून ताईचा आदर्श होती सावरपाडा एक्‍सप्रेस कविता राऊत. कविता राऊतपासून प्रेरणा घेऊन ताईने धावण्याचा सराव सुरू केला. प्रथम शालेय स्तरावरील स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. तिच्या शाळेतील शिक्षक भगवान हिरकुड यांनी तिची गुणवत्ता हेरली आणि तिला जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेसाठी संधी दिली. हिरकुड यांचा विश्‍वास सार्थ ठरवताना ताईने त्याही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय प्रशिक्षक विरेंद्र सिंग यांनी घेतली. त्यांनी तिला भोसला सैनिकी शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि तिच्या सरावाची, शिक्षणाची त्याचप्रमाणे दोन्ही वेळच्या जेवणाचीदेखील सोय केली.
ताई बामणेचे वडील हिरामण आणि आई हिराबाई यांच्या पाच अपत्यांपैकी ताई एक. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. नाशिकमधील हरसुलजवळ असलेल्या दलपतपूर नावाच्या लहानशा खेड्यात ताईचा जन्म झाला. ताई शाळेत असल्यापासूनच कविता राऊत ही तिची आदर्श बनली. कविताला मिळालेल्या एका मोठ्या पुरस्कारानंतर नाशिकमध्ये तिला मिरवणुकीने वाजत गाजत आणले होते, तेव्हा त्यात जल्लोष करणाऱ्या खेळाडूंमध्ये ताईदेखील होती. आणि त्या मिवणुकीच्या वेळीच ताईने आपणही देशाचे प्रतिनिधित्व करायचेच असा ठाम निर्धार केला.
राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यानंतर ताईची विजयवाडा येथील स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत तिने सुवर्णपदक पटकावले आणि त्यामुळेच तिची फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रशिक्षक शिबिरासाठी निवड झाली. या शिबिरात ताईने अथक मेहनत घेतली. त्याचा परिणाम ताबडतोब दिसून आला. भारतात परतल्यावर ती शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली आणि त्या स्पर्धेत तिने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
हळूहळू ताईचे नाव नाशिकसह संपूर्ण राज्यात नावारूपाला येऊ लागले आणि त्यामुळेच गेल इंडिया या कंपनीने तिला खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले. त्यामुळे ताईचा स्पर्धा सहभाग, परदेशातील सराव यांसाठी मोठी मोलाची मदत झाली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)