क्रिकेट पंच संघटनेची “सुवर्ण’ वाटचाल! (भाग 1)

अमित डोंगरे

महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटना यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. देशातील ही पहिलीच क्रिकेट पंच संघटना आहे, जिची स्थापना 1967 साली झाली. म्हणजे अखेर पंचांनाही काही अडचणी असतील, किंवा त्यांना राज्य संघटनेवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मोठी दूरदृष्टी ठेवून या संघटनेची तेव्हा मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे पण . . .

-Ads-

हा जो पण…म्हणालो ना तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या लेखात पुढे त्याचा उल्लेख येईलच. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला पंच, स्कोअरर आणि सर्वात महत्त्वाचे कार्यकर्ते नावाचा ऑक्‍सिजन पुरविण्याचे काम ही पंच संघटना गेली पन्नास वर्षे अव्याहतपणे करत आहे. संघटनेचे पहिले अध्यक्ष अप्पासाहेब मोहनी यांच्यापासून आजच्या तेजकिशन हंडूंपर्यंत प्रत्येकाने ही संघटना एखाद्या कुटुंबाप्रमाणे सांभाळली. या कुटुंबाचे प्रमुख होते चंद्रकांत साठे सर. ‘बॅकबोन’ प्रमाणे त्यांनी पदावर असताना किंवा नसतानाही संघटनेचे कामकाज चालू ठेवले व एक प्रकारे संघटना जिवंत ठेवली. भारतातील सर्वात जुन्या असलेल्या या पंच संघटनेला शहरी स्वरूप येणे तसे साहजिकच होते, कारण सर्वच कामकाज पुण्यातून चालत असे. जिल्हा संघटना तितक्‍या सक्षम नव्हत्या, त्यांच्याकडे तितके मनुष्यबळ, पंच उपलब्ध नव्हते. मात्र, हे चित्र 2000 सालानंतर खऱ्या अर्थाने पालटले. जिल्हा संघटना सक्षम झाल्या. पंच तयार होऊ लागले. आज तर त्यातील काही पंच थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पंच पॅनक्‍लबवर स्थानापन्न झाले आहेत. हे यश कोणा एकट्याचे नव्हे तर पंच संघटनेचे आणि ती चालवणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आहे.

गत रविवारी पंच संघटनेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी आंतरराष्ट्रीय पंच आणि माजी खेळाडू शरवीर तारापोर उपस्थित होते. सकाळी पंच संघटनेचा प्रदर्शनीय सामना देखील खेळवण्यात आला. प्रमुख कार्यक्रमात कै. चंद्रकांत साठे सर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा मागोवा घेणारा चरित्रपट दाखवण्यात आला व त्याद्वारे साठे सरांना संघटनेने श्रद्धांजली अर्पण केली. या चरित्रपटाची संकल्पना संघटनेचे पॅनल पंच अनिश सहस्रबुद्धे यांची होती. याच कार्यक्रमात तारापोर यांच्या हस्ते विविध पंचांना, पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली.

1998 साली मी या संघटनेत जेव्हा दाखल झालो तेव्हादेखील घरातीलच कोणी सदस्य असल्याप्रमाणे तेथील पदाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या वर्तुळात सामील करून घेतले व आमच्यात एक ऋणानुबंध तयार झाले. ते आजही कायम आहेत. चंद्रकांत साठे, सुरेश देव, तेजकिशन हंडू, शशांक रानडे, नाना कोंढरा, अविनाश घाटपांडे, पांडूरंग होले, नंदकुमार भागवत, दीपक वर्तक, एस. एन. दिघे, पराग पाठक, प्रसाद ओव्हाळ, रोहित पंडीत, सचिन मातले, जांभळे सर, अमोल माने, अनिल गजांगी, अजित चव्हाण, संजय गोडबोले, संतोष पळसुले, रवींद्र राजपाठक, सुधीर थत्ते, प्रसाद नाईक, मंगेश नाईक, दीपक कोंडेगल, एम. जी. कुलकर्णी, विनय जोशी, वेंकट, प्रज्ञेश पितळे, नितीन सामल या मंडळींबरोबर संघटनेत काम करताना प्रत्येकजण संघटनेच्या वाढीसाठी झटतोय याचा वेळोवेळी प्रत्यय येत आला.

संघटनेचे अनेक पंच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पॅनेलवर गेले. सध्या विनीत कुलकर्णी, मुकुंद मंडले, गणेश चऱ्हाटे, स्वरूपानंद कुकूनुर, पराशर जोशी हे पुण्याचे पंच पॅनलवर आहेत. संदीप चव्हाण जरी पुण्यातून निवडले गेले तरी ते नंतर मुंबईत स्थायिक झाल्याने मुंबई संघटनेशी जोडले गेले. याव्यतिरिक्‍त अनिष सहस्रबुद्धदे हे सोलापूरचे पंचदेखील आज पॅनलवर आहेत याचाच अर्थ आता संघटना खऱ्या अर्थाने खेडोपाडी पोहोचत आहे. तेथील संघटनेत पंचगिरी करणाऱ्यांना वाव मिळू लागला आहे. त्यांच्यातील गुणवत्ता देखील अधोरेखित होत आहे हेच तर कोणत्याही संघटनेचे यश असते.

संघटनेचे ‘बॅकबोन’ चंद्रकांत साठे आज हयात नाहीत. पण संघटनेच्या प्रत्येक कणाकणात त्यांचे अस्तित्व आजच नव्हे, तर कायमच जाणवत राहील. या रिकाम्या झालेल्या खुर्च्या कुठेतरी वेदना देतातच. ज्या माणसाने ही संघटना जिवंत ठेवली त्याच्या नावाचा एखादा पुरस्कार पंचांसाठी या सुवर्णमाहेत्सवी वर्षापासून सुरू करावा अशी आम्ही पंच मंडळी संघटनेकडे विनंती करत आहोत. कोणतीही संस्था किंवा संघटना केवळ अध्यक्ष, कार्याध्यक्ष अशा मोठया पदांवर काम करणाऱ्यांमुळे मोठी होत नसते, तर ती मोठी होते साठे सरांसारख्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांमुळे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)