क्रिकेट पंच संघटनेची “सुवर्ण’ वाटचाल! (भाग 2)

अमित डोंगरे

महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटना यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. देशातील ही पहिलीच क्रिकेट पंच संघटना आहे, जिची स्थापना 1967 साली झाली. म्हणजे अखेर पंचांनाही काही अडचणी असतील, किंवा त्यांना राज्य संघटनेवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी मोठी दूरदृष्टी ठेवून या संघटनेची तेव्हा मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे…

-Ads-

क्रिकेट पंच संघटनेची “सुवर्ण’ वाटचाल! (भाग 1)

बेघर संघटनेला कार्यालय हवे

मी मघाशी जो पण . . . . . असे म्हणालो ना त्यावर आता प्रकाश टाकूयात. संघटना आज सुवर्णमहोत्सव साजरा करत असली तरी आज संघटनेला स्वतःचे कार्यालय नाही. जशी ही संघटना भारतातील पहिलीच क्रिकेट पंच संघटना आह,े तशीच स्वतःचे कार्यालय नसलेलीही बहुतेक एकमेव संघटना आहे. पूर्वी नेहरू स्टेडियममध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यालय असताना तिथूनच पंच संघटनेचेही कामकाज चालायचे. आता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यालय जेव्हा नवीन ठिकाणी स्थलांतरीत झाले, तेव्हापासून पंच संघटना मात्र उघड्यावर पडली. टिळक रस्त्यावरील ‘अशोक स्पोर्टस्‌’ या अशोक शिंदे यांच्या दुकानाच्या पत्त्यावरून काही काळ पंच संघटना कामकाज व पत्रव्यवहार करत होती आता संघटनेतीलच एका सदस्याच्या घरच्या पत्त्यावरून कामकाज चालवले जाते. ही एक अत्यंत वेदनादायी आणि तितकीच खेदजनक बाब आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर पंच संघटनेने वैयक्‍तिक पातळीवर स्वतःचे छोटे का होईना पण एक हक्काचे कार्यालय असावे यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसले नाहीत, हे दुर्दैव नव्हे काय?

स्वायत्त नोंदणी ही चूकच
महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेने 2013 साली संघटनेची ‘स्वायत्त संस्था’ अशी जी नोंदणी करून घेतली, ही सर्वात मोठी चूक ठरली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटना ही माहराष्ट्र क्रिकेट संघटनेचीच समजली जात होती. मग ही वेगळी चूल मांडायची दुर्बुद्धी का सुचावी? ज्ञानेश्‍वर आगाशेंच्या काळापासून किंवा स्थापनेपासून ते अजय शिर्के यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही पंच संघटनेला महाराष्ट्र क्रिकेट संघटनाच पालकत्व देत होती. मग अचानक केवळ बाहेरून काही देणग्या, रकमा मिळवता याव्यात यासाठी हा वेगळा घरोबा करण्याची मानसिकता कोणाचा मनात आली हे त्या परमेश्‍वरालाच ठाऊक. अजूनही मूळ संघटनेशी चर्चा करून यातून मार्ग काढता येईल. सर्वच मार्ग बंद झालेले नाहीत. आज वेगळा घरोबा करून संघटनेने काय साधले याचाही विचार झाला पाहिजे. मूळ महाराष्ट्र क्रिकेट सघटनेला पंच, स्कोअरर, कार्यकर्ते आजही पंच संघटना पुरवते. पंचांच्या कार्यशाळा पुण्याबरोबरच जिल्हास्तरावरही होतात. मग तुझं नी माझं हे कशासाठी. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेशी चर्चा होऊन संघटनेला स्वतःचे कार्यालय उपलब्ध होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. प्रस्ताव करायला काय हरकत आहे.

आज केवळ सुवर्ण महोत्सव साजरा झाला. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अजय शिर्के यांनी संघटनेला स्वतःचे मैदान असावे हे स्वप्न उराशी बाळगले होते व ते पूर्णही करून दाखवले. आता पंच संघटनेनेही येत्या काळात स्वतःचे कार्यालय असावे हे स्वप्न ठेवून त्या दृष्टीने वाटचाल केली, तरच हा सुवर्ण महोत्सव सत्कारणी लागला असे म्हणता येईल.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे प्रस्ताव द्यावा

स्वतःचे कार्यालय हा विषय इतकी वर्षे बाजूला राहिला असला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याशी सल्लामसलत करून वा पत्रव्यवहार करून संघटनेला स्वतःचे कार्यालय मिळवून देण्यासाठी प्रस्ताव द्यायला हरकत नाही. ‘मदर बॉडी’ म्हणून संघटनात्मक पातळीवर याचा आपटे निश्‍चितच सकारात्मक विचार करतील. रोज होणारे सामने, त्यांचे नियोजन, पंचांची नियुक्ती, संघटनेचे साहित्य, पदाधिकाऱ्यांना आणि पंचांना बसण्यासाठी जागा, पंचांसाठी नियमांबाबत होणाऱ्या कार्यशाळा या कार्यालयात व्हाव्यात हे तर सर्वात महत्त्वाचे आहे. कोण, कुठल्या सभागृहात असे कार्यक्रम यापुढेही होत राहणे संघटनेसाठी अभिमानास्पद ठरणार नाही. संघटनेकडून पंच संघटनेला निश्‍चितच मदत होईल. असा ठोस प्रस्ताव सादर केला तर त्याला कोणीच विरोध करणार नाही.

आरोग्य व विमा कवच असावे
संघटनेचे आज पुण्याबरोबरच जिल्हा पातळीवर मिळून सुमारे दोनशे सभासद आहेत. इतक्‍या मोठ्या संख्येने पंच उपलब्ध असताना संघटनेने त्यांना आरोग्य कवच आणि विमा कवच पुरवलेच पाहिजे. हवे तर अर्धी रक्कम संघटनेने उभी करावी व उर्वरित रक्कम प्रत्येक पंचाकडून, सभासदाकडून घ्यावी. पण मैदानावर कार्यरत असणाऱ्या पंचाला, प्रवासादरम्यान किंवा इतरत्र कुठेही वैद्यकीय मदतीची गरज पडली, तर तो स्वयंपूर्ण असावा. संघटनेचे जुने सभासद विनय जोशी ‘न्यू इंडिया एश्‍युरन्स’ मध्येच सेवेत आहेत त्यांच्यामार्फत पूर्वी अनेक पंचांनी आरोग्य विमा घेतलेला आहे, त्यांच्याशीच संपर्क साधून या सुवर्ण महोत्सवी वर्षात संघटनेला आपल्या सर्व पंचांना विमा कवच पुरवणे सहज शक्‍य आहे. नवोदित व सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचांना जसे संघटना प्रोत्साहनपर पुरस्कार देते, तसेच विमा कवचही या निमित्ताने द्यावे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)